Janhvi Kapoor on Mother Sridevi Death : ‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत तिचं पदार्पण अगदी सहज झालं असलं तरी त्यानंतर तिनं तिच्या अनेक सिनेमांमधून अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आईच्या निधनावेळी अभिनेत्री फक्त २० वर्षांची होती. त्यामुळे तेव्हाची परिस्थिती तिच्यासाठी जरा कठीणच होती.
२०२३ मधील बरखा दत्ता यांच्या मुलाखतीत जान्हवीनं तिच्या आईच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. त्याच कार्यक्रमाच्या अलीकडच्या भागात श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर विनोद, मीम्स आणि काही अनावश्यक चर्चा झाली, त्याबद्दल तिनं भावना व्यक्त केल्या.
जान्हवी म्हणाली, “तो काळ मी शब्दांत सांगूच शकत नाही. सांगितलं तरी लोक समजून घेतील की नाही हे माहीत नाही. लोकांनी माझी दया यावी आणि म्हणून मी काही बोलतेय, असं वाटू नये त्यामुळे मी काही गोष्टी बोलणंच टाळते. सगळ्यांना हेडलाईन हवी असते; पण माझ्या आयुष्यातील इतक्या वेदनादायक गोष्टींचा वापर मी चर्चेसाठी करावा, हे मला मान्य नाही.”
पुढे ती म्हणाली, “आई गेल्यानंतरची परिस्थिती खूपच कठीण होती. काही लोकांनी त्याच्यावर मीम्स केले. गमावलेल्या व्यक्तीचे मीम बनताना पाहणं हे खूपच निराशाजनक होतं. मला कळत नाही, अशा घटनांवर मीम किंवा विनोद करणं कुणाला कसं काय सुचू शकतं. पण मला वाटतं, हे पुन्हा पुन्हा होणार आहे. कारण- आपणच या गोष्टींना लाFक्स आणि व्ह्युज देऊन प्रोत्साहन देत असतो. पूर्वी काही गोष्टी पाहण्यापासून, बोलण्यापासून आपल्याला रोखणारं अंतर्मन होतं; पण आता ते अंतर्मनच हरवलंय, असं मला वाटतं.”
आईच्या निधनावेळी २० वर्षांच्या जान्हवीला काही काळ टीव्हीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्याबद्दल ती म्हणाली, “मला बराच काळ टीव्ही पाहू दिला गेला नाही. तरीही काही गोष्टी माझ्यासमोर येत राहिल्या. मुलगी या नात्यानं ते खूपच दुखावणारं होतं. पण, माझा राग फक्त मुलगी म्हणून नव्हता. आपला समाज नक्की कसा बदलत जातोय, हा प्रश्न मला तेव्हा पडायचा. लोक मीडियाच्या नैतिकतेवर टीका करतात; पण आत्मपरीक्षण मात्र कुणी करीत नाही आणि हेच धक्कादायक आहे.”
