Actress Reveals Her Anti-Aging Secrets Without Cosmetic Surgery : अलीकडे अनेक कलाकार मंडळी तरुण दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या सर्जरी करतात, इंजेक्शन्स घेतात. तसेच बोटॉक्स वगैरे करतात. पण, काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्या तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी कुठलीही कृत्रिम पद्धत वापरत नाहीत.
मनोरंजन विश्वातल्या अनेक अभिनेत्री तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त उत्तम आहार आणि योग्य त्या पद्धतीचा व्यायाम करतात. स्वत:च्या डाएटमध्येही त्या ठरावीक पदार्थांचाच वापर करतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिने कोणतीही कृत्रिम सर्जरी न करता, वयाच्या पन्नाशीतही आपला फिटनेस आणि सौंदर्य जपलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे कश्मीरा शाह.
अभिनेत्री कश्मीरा शाहने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. परंतु, ५३ व्या वर्षीही कश्मीरा तितकीच तरुण आणि फिट आहे. नुकतेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये कश्मीराने स्वत:च्या फिटनेसचे गुपित शेअर केले. कश्मीराने सांगितले की, तिने आजवर अनेक गाण्यांमध्ये परफॉर्मन्स केला आहे. त्यासाठी तिने स्वतःची शरीरयष्टी आणि त्वचा खूप चांगल्या प्रकारे जपली.
आताचे अनेक तरुण कलाकार फिट दिसण्यासाठी इंजेक्शन किंवा वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. मात्र, कश्मीरा या गोष्टींपासून लांब राहते. तिने स्पष्ट केले की, तिने आजवर कधीही ‘बोटॉक्स’ किंवा कोणत्याही प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी केलेली नाही. सकस आहार हेच तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित आहे. कश्मीरा म्हणते, “मी चांगला आहार घेते आणि माझ्या जेवणात जास्तीत जास्त सॅलडचा समावेश असतो. मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत. तसेच मला आवळा, कैरी आणि मीठ-तिखट लावलेली चिंच खायला खूप आवडते.”
दरम्यान, ठाणे येथील केआयएमएस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनीही कश्मीराच्या मतावर प्रतिक्रिया दिली. दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात ते म्हणाले, “आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचा आणि वाढत्या वयावर होत असतो. पोषक तत्त्वांनी युक्त आहार घेतल्यामुळे शरीरात ‘कोलेजन’ची निर्मिती वाढते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण दिसते. बोटॉक्ससारख्या उपचारपद्धती तात्पुरते निकाल देतात; पण योग्य पोषण हे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते.
त्वचेसाठी काय खाणे फायदेशीर ठरते?
फळे, भाज्या, सुका मेवा आणि बिया यांसारख्या अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. प्रथिनांमुळे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती होते; तर सुक्या मेव्यातील आरोग्यदायी मेदामुळे (हेल्दी फॅट्स) त्वचा हायड्रेटेड आणि लवचिक राहते.
आहार बोटॉक्सची जागा घेऊ शकतो का?
डॉ. अमरीन यांच्या मते, आहार आणि बोटॉक्स यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. ‘बोटॉक्स’ स्नायूंच्या हालचालींवर काम करून, सुरकुत्या लगेच कमी करते; तर संतुलित आहार हा दीर्घकालीन फायदेशीर आहे. तो वय वाढण्याची प्रक्रिया संथ करतो आणि त्वचा सुधारतो. त्यासोबतच भरपूर पाणी पिणे आणि पाणीदार फळांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
तजेलदार त्वचेसाठी आहार कसा असावा?
त्वचा सुंदर दिसण्यासाठी महागड्या प्रकृतीनुरूप योग्य त्या आहाराचे सातत्य महत्त्वाचे असते. ऋतूनुसार मिळणारी फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सुका मेवा व बिया यांचा आहारात समावेश करावा. क जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांमुळे त्वचा तजेलदार राहते; तर झिंक आणि बायोटिनमुळे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
सूचना – कलाकारांचे डाएट आणि फिटनेस रुटीन हे त्यांच्या कामाचे स्वरूप आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठरवलेले असते. तसेच वरील माहिती अभिनेत्रीचे वैयक्तिक अनुभव आणि तज्ज्ञांच्या मतावर आधारित आहे. कोणताही नवीन डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
