Mandana Karimi Slams Boman Irani : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांततेवरील चर्चेच्या विधानावर एक उपरोधिक व्हिडीओ शेअर केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. जवळपास महिनाभर चाललेल्या आलेल्या या युद्धाच्या दरम्यान, ट्रम्प यांनी वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. याच विधानाचा धागा पकडत बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

युद्धामुळे भारतात निर्माण झालेल्या एलपीजी (LPG) गॅसच्या टंचाईवर आणि स्वतःच्या ‘इराणी’ असण्यावर बोमन इराणींनी मिश्किल टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बोमन इराणी गमतीने म्हणालेत की, “सध्या एक बातमी व्हायरल होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ‘इराणी’ लोकांशी बोलायचे आहे आणि त्यासाठी मला, स्मृती इराणी आणि अरुणा इराणी यांना बोलावण्यात आले आहे. मी शांततेसाठी काहीही करायला तयार आहे, पण मी वॉशिंग्टनला जाणार नाही. त्याऐवजी ट्रम्प यांनी मुंबईतील दादर पारशी कॉलनीमध्ये यावे. येताना त्यांनी एक गॅस सिलिंडर सोबत आणला तर आमचे जीवन अधिक सोपे होईल.”

अनेक सेलिब्रिटींनी आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओचे कौतुक केले आहे. पण ‘बिग बॉस’ फेम आणि इराणी अभिनेत्री मंदाना करिमीने मात्र बोमन इराणी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

Award Banner

बोमन इराणींनी शेअर केलेल्या व्हिडीओखाली मंदानाने कमेंट केली आहे की, “बोमन इराणी सर… अचानक तुम्हाला इराणबद्दल खूप काही बोलायचं आहे. यासाठी वेळही खूप वेगळी निवडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये लोकांना अटक केली जात आहे, फाशी दिली जात आहे आणि त्यांचे आवाज दाबले जात आहेत. हजारो लोक मारले गेले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. माझ्यासारख्या अनेक लोकांनी हे दुःख सोसले आहे आणि आम्ही त्याबद्दल सतत बोलत आलो आहोत. पण आता… अचानक तुमचा एक व्हिडीओ येतो. आता तुम्हाला चिंता वाटू लागली आहे. आता गॅस, ट्रम्प आणि ‘माझ्या घरी या’ या विषयावर विनोद केले जात आहेत.”

Mandana Karimi commnt on Boman Irani Donald Trump Roast Video
मंदाना करिमीची बोमन इराणी यांच्यावर टीका

“तुम्ही आणि पारशी समुदाय इराणमधूनच आला आहात. नक्कीच तिथल्या इतिहासाशी तुमचं नातं आहे. मग जेव्हा इराणमध्ये लोक मरत होते, तेव्हा तुम्ही कुठे होतात? आता अचानक गॅस आणि जागतिक राजकारणावर परिणाम होऊ लागला, म्हणून प्रतिक्रिया दिली जाते? खरंच… तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात. इतकी वर्षे पाळलेले मौन आणि आता थेट उपरोधिक विनोद; हा प्रवास खूपच वेगवान होता. असो… हे माझे फक्त एक निरीक्षण होते”, असे ती पुढे म्हणाली.

Mandana Karimi comment on Boman Irani Donald Trump Roast Video
मंदाना करिमीची बोमन इराणी यांच्यावर टीका

यासह तिने आणखी एक कमेंट केली आहे, ज्यात ती म्हणते, “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि ज्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे, त्याला पाठिंबा देण्याचा अधिकार आहे. पण एकदा प्रामाणिकपणे विचार करूया. जर तुम्ही स्वतःला ‘इराणी’ किंवा ‘पारशी’ म्हणवून घेत असाल आणि ती ओळख, तो इतिहास सोबत बाळगत असाल, तर जेव्हा जानेवारीत ४०,००० हून अधिक लोक मारले गेले, तेव्हा तुम्ही गप्प का होतात? आजही तिथे लोकांना फाशी दिली जात आहे, अटक केली जात आहे, तरीही तुम्ही काहीच बोलला नाहीत… आणि आता अचानक तुम्हाला गॅसची काळजी वाटू लागली म्हणून तुम्ही बोलताय? हे चुकीचे आहे. याला काळजी वाटणे म्हणत नाहीत, तर याला सोयीनुसार व्यक्त केलेले दुःख म्हणतात. सध्या इराणमधील माझ्या लोकांचा आवाज दाबला गेला आहे. गेल्या महिनाभरापासून तिथे इंटरनेट बंद आहे. अनेक कुटुंबे एकमेकांपासून तुटली आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्वतःवर बेतल्यावरच प्रतिक्रिया देते, तेव्हा मी त्यावर नक्कीच प्रश्न उपस्थित करेन. जेव्हा एखादी व्यक्ती हजारो मृत्यू, फाशी आणि अन्याय याकडे दुर्लक्ष करते, पण गॅसच्या किमती वाढल्या की समोर येते, तेव्हा त्याला ढोंगीपणा म्हणतात.”

Mandana Karimi comment on Boman Irani Donald Trump
मंदाना करिमीची बोमन इराणी यांच्यावर टीका

दरम्यान, बोमन इराणी यांनी अद्याप मंदानाच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलेले नाही. दुसरीकडे जावेद जाफरी, सौरभ पंत आणि समिरा रेड्डी यांसारख्या अनेक कलाकारांनी बोमन इराणी यांच्या विनोदी बुद्धीचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.