Actress Mumtaz Birthday Story: बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या मुमताज यांनी दारा सिंग यांच्यासोबत तब्बल १६ ॲक्शनपटांत काम केले, परंतु यामुळे त्यांच्यावर ‘स्टंट हिरोईन’ असा शिक्का बसला आणि धर्मेंद्र तसेच शशी कपूर यांनी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला. १९६७ मध्ये आलेल्या ‘राम और श्याम’ चित्रपटामुळे त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. पुढे राजेश खन्ना यांच्यासोबत ‘दो रास्ते’ आणि ‘रोटी’ सारखे ८ ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या मुमताज यांनी १९७४ मध्ये उद्योगपती मयूर माधवानी यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला आणि यशाच्या शिखरावर असताना सिनेसृष्टी सोडली.
मुमताज यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी, ३१ जुलै १९४७ रोजी मुंबईत झाला होता. मुमताज यांची आई आणि मावशी दोघीही चित्रपटसृष्टीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायच्या. त्यामुळे मुमताज यांनीही बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्या ‘सोने की चिडिया’ नावाच्या चित्रपटात दिसल्या होत्या. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच याच वर्षी आलेल्या ‘तलाक’ या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.
धर्मेंद्र आणि शशी कपूर यांनी मुमताजबरोबर काम करण्यास दिलेला नकार
सुरुवातीला मुमताज यांनी अनेक चित्रपटांमध्ये ‘स्टंट हिरोईन’ म्हणून काम केलं होतं. म्हणजेच ते ॲक्शन चित्रपट होते. या चित्रपटांमध्ये त्यांची जोडी दारा सिंग यांच्याबरोबर होती. दोघांनी १६ सिनेमे केले, त्यातील निम्म्याहून जास्त चित्रपट हिट झाले. मात्र, ‘स्टंट हिरोईन’ असा ठपका बसल्यामुळे शशी कपूर आणि धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज कलाकारांनी मुमताजबरोबर काम करण्यास नकार दिला होता.
१९६७ मध्ये आलेला ‘राम और श्याम’ हा चित्रपट मुमताज यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटात दिलीप कुमार यांची दुहेरी भूमिका होती. यानंतर मुमताज यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मुमताज स्टार झाल्यानंतर धर्मेंद्र यांनीही त्यांच्याबरोबर चित्रपट केले. मुमताज यांनी धर्मेंद्र, दारा सिंग, दिलीप कुमार, संजीव कुमार, फिरोज खान आणि शम्मी कपूर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली. पण त्यांची जोडी सर्वात जास्त राजेश खन्ना यांच्याबरोबर गाजली. त्यांनी एकापाठोपाठ ८ हिट सिनेमे केले. ‘दो रास्ते’, ‘सच्चा झूठा’, ‘रोटी’, ‘आप की कसम’, ‘अपना देश’, ‘दुश्मन’, ‘बंधन’ आणि ‘प्रेम की कहानी’ यांचा समावेश आहे.
यशाच्या शिखरावर असताना मुमताज यांनी हिंदू उद्योगपतीशी केलं लग्न
मुमताज यांनी आपल्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं होतं. मुस्लीम असलेल्या मुमताज यांनी १९७४ साली हिंदू उद्योगपती मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं. मुमताज यांचे पती अमेरिकेत लहानाचे मोठे झाले आहेत आणि युगांडामध्येही राहिले आहेत. मयूर यांच्याशी लग्न केल्यानंतर मुमताज इंडस्ट्रीपासून दूर गेल्या. त्या पतीबरोबर परदेशात स्थायिक झाल्या. त्यांना नताशा आणि तान्या नावाच्या दोन मुली आहेत. नताशाचं लग्न अभिनेता फरदीन खानशी झालं होतं, पण आता ते वेगळे राहत आहेत.
मुमताज आता काय करतात?
मुमताज यांनी ‘आंधियां’ या चित्रपटातून अभिनयात पुनरागमन केलं होतं, पण १९९० साली आलेला हा सिनेमा फ्लॉप ठरला. नंतर त्या मोठ्या पडद्यावर दिसल्या नाहीत. मुमताज आता पतीबरोबर लंडनमध्ये राहतात. त्या भारतातही येत-जात असतात.
