Bollywood Actress On Relationship Rumors With Govinda : गोविंदा हा बॉलीवूडचा सुपरस्टार असून, ९० च्या दशकात त्यानं अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. आजही लोक त्याच्या अभिनयाचे आणि डान्सचे चाहते आहेत. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलाय. अनेक अभिनेत्रींबरोबर त्याची ऑन-स्क्रीन जोडी हिट झाली. तसेच काही अभिनेत्रींबरोबर त्याच्या ऑफ-स्क्रीन अफेअर्सच्याही चर्चा होत्या. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नीलम कोठारी.

‘इल्जाम’ आणि ‘लव्ह 86’ यांसारख्या चित्रपटांमधील गोविंदा आणि नीलम कोठारी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटांनंतर दोघांमध्ये खऱ्या आयुष्यातही अफेअरच्या अफवा पसरल्या. गोविंदाने एका मुलाखतीत नीलमबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, नीलमने हे नेहमीच फेटाळून लावलं होतं. तसंच या अफवा माध्यमांनी पसरवलेल्याचेही सांगितले.

अलीकडेच उषा काकडे प्रॉडक्शन्सच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना नीलमने ९० च्या दशकातील गोविंदाबरोबरच्या कथित नात्यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले.

गोविंदा खूप चांगला माणूस आहे पण…

पॉडकास्टच्या होस्टने नीलमला गोविंदावर तिचे प्रेम होते का, असा प्रश्न विचारला असता, ती थोडी आश्चर्यचकित झाली. त्यावर ती म्हणाली, “अरे बापरे! हे कोणी सांगितलं? गोविंदाजी खूप चांगले माणूस आहेत; पण हा प्रश्नच चुकीचा आहे. हे खरं नाही. तो एक उत्तम व्यक्ती आहे आणि आम्ही अनेक हिट चित्रपट एकत्र केले आहेत; पण आमच्यात असं काहीच नव्हतं. सॉरी, पण हे अजिबात खरं नाही.”

गोविंदाबरोबरच्या अफेअरच्या अफवांबद्दल…

२०२४ मध्ये Hauterfly ला दिलेल्या मुलाखतीतही नीलमने या अफवांबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणालेली, “त्या काळात आमच्या अफेअरच्या अफवांबद्दल स्पष्टीकरण द्यायला कोणीच नव्हतं. माध्यमं त्यांना वाटेल ते छापायची. त्या काळात आम्ही पत्रकारांपासून घाबरून असायचो. कारण- लेखणीची ताकद खूप मोठी होती. जर तुम्ही २–३ पेक्षा जास्त चित्रपट एकत्र केले, तर लोक आपोआप समजायचे की… (तुम्ही दोघे एकत्रच आहात).”

गोविंदाने नीलमबद्दल काय म्हटलं होतं?

१९९० साली Stardust ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने नीलमबरोबरच्या नात्याबद्दल कबुली दिली होती. तो म्हणाला होता, “आम्ही खूप चित्रपट एकत्र केले. वारंवार भेटायचो. जशी तिची ओळख वाढत गेली, तसा मी तिच्या अधिक प्रेमात पडलो. ती अशी स्त्री होती, जिच्यावर कोणताही पुरुष प्रेम करू शकतो. माझंही तसंच झालं.”

गोविंदा आणि नीलम कोठारी (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस/स्क्रीन)
गोविंदा आणि नीलम कोठारी (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस/स्क्रीन)

तर मी नीलमशी लग्न केलं असतं : गोविंदा

गोविंदाने त्या मुलाखतीत हेही सांगितले होते की, नीलमवरील प्रेमामुळे त्याने सध्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्याशी ठरलेला साखरपुडाही मोडला होता. तो म्हणाला होता, “मी सुनीताला माझ्याशी असलेलं नातं तोडायला सांगितलं होतं. साखरपुडा मोडला होता; पण पाच दिवसांनी सुनीतानं मला फोन केला नसता आणि पुन्हा समजावलं नसतं, तर कदाचित मी नीलमशी लग्न केलं असतं. मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यात काहीच चुकीचं नव्हतं.”

गोविंदा-सुनीता आणि नीलम यांच्याबद्दल…

गोविंदाने १९८७ मध्ये सुनीता आहुजाशी लग्न केले. त्यावेळी गोविंदा २४, तर सुनीता १८ वर्षांची होती. त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन, अशी दोन मुले आहेत. तर नीलम कोठारीने २००० साली उद्योगपती ऋषी सेठियाशी लग्न केले; मात्र त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०११ मध्ये तिने अभिनेता समीर सोनीबरोबर लग्न केले. या दोघांनी २०१३ साली अहाना नावाच्या मुलीला दत्तक घेतले.