Bollywood Actress Neena Gupta : मनोरंजन क्षेत्रात काम करताना सेटवर किवा शूटिंगदरम्यान अनेकदा वाईट आणि त्रासदायक घटनांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्रींच्या वाटेला तर असे वाईट प्रसंग अनेकदा येत असतात. त्यात एखादा कलाकार नवखा असेल, तर त्याला काही वेळेस विचित्र वागणुकीचा त्रास सहन करावा लागतो. असंच काहीसं झालं होतं, नीना गुप्ता यांच्याबरोबर.

‘साथ-साथ’, ‘गांधी’, ‘जाने भी दो यारों’, ‘मंडी’, ‘खलनायक’, ‘बधाई हो’, ‘८३’ अशा विविध कलाकृतींतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजही त्या इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांना सेटवर दिग्दर्शकाकडून वाईट वागणूक मिळाली होती, ज्याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सेटवर एका दिग्दर्शकानं नीना गुप्ता यांना शिवीगाळ केली होती, तेसुद्धा त्यांची काहीच चूक नसताना. तसेच नीना यांनी हेही मान्य केलं की, काही वेळा त्यांनी इच्छा नसताना त्यांना छोट्या आणि खराब भूमिकाही कराव्या लागल्या. त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे या भूमिका स्वीकाराव्या लागल्याचं त्यांनी मान्य केलं.

सेटवर दिग्दर्शकाने दिलेल्या शिव्या

सेटवर दिग्दर्शकाकडून चुकीच्या वागणुकीचा प्रसंग सांगत त्या म्हणाल्या, “तुम्ही विचारही करू शकणार नाही; पण सेटवर मला शिव्या देण्यात आल्या. माझी काहीही चूक नसताना मला आई-बहिणीवरून शिव्या ऐकाव्या लागल्या. दिग्दर्शकानंच ते शब्द वापरले होते. मी तिथे अडकले होते. कारण- मला पैसे हवे होते. जर मला तेव्हा दुसरं काम मिळालं असतं, तर मी हे नक्कीच केलं नसतं.”

मी देवाकडे प्रार्थना करत होते की…

नीना यांनी सांगितलं की, काही भूमिका स्वीकारल्यानंतर ते चित्रपट कधीच रिलीज होऊ नयेत, अशी प्रार्थना त्या करायच्या. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना नीना म्हणाल्या, “एका चित्रपटात, मी शक्ती कपूरच्या टोळीची फक्त एक अनामिक सदस्य होते. तिथे माझं काम म्हणजे फक्त मी बाजूला उभी होते. तेव्हाच्या परिस्थितीमुळे मला या गोष्टी करणं भाग पडलं.”

नीना गुप्ता या मालिका, सिनेमांसह विविध ओटीटी माध्यमांवरही तितक्याच सक्रिय आहेत. त्यांनी ‘खानदान’, ‘गुल गुलशन गुलफाम’, ‘सांस’, ‘जस्सी जैस्सी कोई नहीं’, ‘मेड इन हेव्हन’, ‘पंचायत’ अशा अनेक कलाकृतींमधून अभिनय केला आहे.

अलीकडेच त्या ‘वध २’ या क्राइम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या चित्रपटात संजय मिश्रा आणि कुमुद मिश्रा यांनीही भूमिका केल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.