Neha Dhupia Shares Anti Bloating Drink Recipe : आजच्या रोजच्या धावपळीच्या जीवनात शरीरासंबंधित समस्या वाढल्या आहेत. यावर अनेकजण विविध उपाय करताना दिसतात. सोशल मीडियावर अनेकजण डाएट प्लॅन्स सांगताना दिसतात. यात काही बॉलीवूडचे कलाकारसुद्धा चाहत्यांपर्यंत अशा समस्यांवरील उपाय सांगतात. अभिनेत्री नेहा धुपिया ही तिच्या सोशल मीडियावर आरोग्यविषयक सूचना देताना दिसते. अशातच आता तिनं ब्लोटिंगवरील एक पेय सांगितलं आहे.
अलीकडेच २१ दिवसांच्या अँटी-इंफ्लेमेटरी चॅलेंजद्वारे हजारो लोकांना हेल्दी लाइफस्टाईल स्वीकारण्यासाठी प्रेरित केल्यानंतर, नेहा धुपिया हिने ब्लोटिंग आणि पचनाचे त्रास – यावर सोपा आणि पारंपरिक उपाय सांगितला आहे.
नेहाने तिचं रात्रीचं एक खास पेय सर्व चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. हे नैसर्गिक पेय पोट शांत ठेवण्यास, ब्लोटिंग कमी करण्यास आणि झोपण्यापूर्वी शरीराला आराम देण्यास मदत करतं, असं नेहा म्हणाली. तसंच दिवसभराच्या थकव्यानंतर हे पेय तिच्यासाठी हमखास उपयोगी ठरतं, असंही तिने सांगितलं.
नेहा म्हणाली, “हे खरंच माझं रात्री घेण्याचं पेय आहे. यामुळे पोट फुगणं कमी होतं, पचन सुधारतं आणि झोपही चांगली लागते.” हे केल्याने नियमित आरोग्यावर चांगला फरक पडू शकतो असंसुद्धा नेहाने सांगितलं आहे.
हे पेय तयार करणं खूप सोपं आहे. पाण्यात बडीशेप, ओवा, जिरे, थोडं बारीक चिरलेलं आलं आणि आवडीनुसार थोडंसं लिंबू घालून हे मिश्रण साधारण पाच मिनिटं उकळायचं. नंतर ते कोमट अवस्थेत प्यायचं.
“इतकंच करा आणि तुमचं रात्रीचं अँटी-ब्लोटिंग ड्रिंक तयार होतं. माझ्यासाठी ते जादूसारखं काम करतं. दिसायलाही छान आणि चवीला देखील छान आहे,” असं नेहाने सांगितलं.
या उपायासाठी नेहाने तिच्या न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांचे आभार मानले. तसेच, हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टर, आहारतज्ज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्यावा, असंही तिने आपल्या चाहत्यांना सांगितलं. कारण आरोग्यविषयक निर्णय प्रत्येकासाठी वेगळे असतात, हे तिने स्पष्ट केलं.
दरम्यान, नेहाबद्दल सांगायचं झाल्यास, ती आपल्या अभिनयासह फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती डाएट आणि व्यायामासह काही घरगुती गोष्टीदेखील करते. अशातच तिनं घरगुती पेय सांगितलं आहे.
टीप : वरील पेयासंबंधित लेख ही अभिनेत्री नेहा धुपियाने सांगितलेल्या माहितीवरून दिली आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. त्यामुळे यासंबंधित योग्य तो सल्ल्यासाठी आहारतज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.
