अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही बॉलीवूडमधील पदार्पणाच्या आधीपासूनच खूप चर्चेत असते. लवकरच ती सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. तर या आधी तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. आर्यन खानबद्दल तिने एक मोठा खुलासा केला आहे.
पलक तिवारी सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ती अनेक मुलाखती देत आहे. काही दिवसांपूर्वी स्पष्ट भाष्य करत तिच्या आणि इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीने तिचा मित्र शाहरुख खानचा लेक आर्यन खान याच्याबद्दल काही खुलासे केले आहेत.
आणखी वाचा : आर्यन खानला चाहत्याने दिला गुलाब, पुढे त्याने केलेल्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष
पलक आणि आर्यन एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. आतापर्यंत अनेकदा त्यांना एकत्र पार्ट्यांमध्येही पाहण्यात आलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानबद्दल बोलताना ती म्हणाली, “तो जसा दिसतो तसाच आहे. तो खूप कमी बोलतो पण जे बोलतो ते अगदी मुद्देसूद आणि प्रभावी बोलतो. तो खूप चांगला आणि शहाणा मुलगा आहे. कोणत्याही पार्टीतदेखील तो एकटा दिसतो. जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो देखील तुमच्याशी हसत हसत संवाद साधेल. पण त्याव्यतिरिक्त जास्त करून तो शांतच असतो.” आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.
दरम्यान, सलमान खान आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘किसी का भाई किसी की जान हा चित्रपट’ 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. तर अभिनेत्री पलक तिवारी देखील या चित्रपटात हटके भूमिका साकारताना दिसेल.