Actress Payal Ghosh Buys House In Mumbai: अभिनेत्री पायल घोष ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. आता अभिनेत्रीने मुंबईत घर खरेदी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने मुंबईत हे घर नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि किती किमतीला विकत घेतले आहे, हे जाणून घेऊ…
अभिनेत्रीने मुंबईतील लोखंडवाला परिसरात स्वतःसाठी एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका सिंधी कुटुंबाकडून हा फ्लॅट तिने खरेदी केला आहे. याची किंमत चार कोटी आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती मुंबईत घर घेण्यासाठी प्रयत्न करत होती.
स्वत:चे घर खरेदी करण्याचा मी जेव्हा प्रयत्न करत होते…
घर खरेदी केल्यानंतर अभिनेत्रीने तिचा आनंद व्यक्त केला. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटशी बोलताना पायल घोष म्हणाली, “हा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी खूप वर्षांपासून मुंबईत राहते. माझे स्वत:चे घर मुंबईत असणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे घर खरेदी करण्यासाठी पैसे होते, मात्र तरीही मी घर घेऊ शकले नव्हते.
मला माझ्यासाठी घर शोधण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. मुंबईचा वैभवशाली म्हणून उल्लेख केला जातो. पण, याची दुसरी बाजूदेखील आहे, त्याबद्दल कोणीच बोलत नाही. एक अशी महिला जी स्वतंत्र आहे, जी स्वत:साठी स्वत: पैसे कमावते, तिला कायम जज केले जाते. मी अभिनेत्री म्हणून दीर्घ काळापर्यंत लोक माझ्याबद्दल त्यांची मतं बनवत असतं. मला असाही अनुभव आला आहे की, काही सोसायटीमधील लोकांना तिथे कोणी मनोरंजन क्षेत्रातील राहायला आलेलं नको होतं. फक्त मी भाड्याने राहायचे तेव्हाच, नाही तर स्वत:चे घर खरेदी करण्याचा मी जेव्हा प्रयत्न करत होते, तेव्हादेखील मी या समस्येचा सामना केला आहे.
मी एक स्वतंत्र महिला आहे, जिने स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी कष्ट करून स्वतःचे पैसे कमावले आहेत. मात्र, मला फक्त चित्रपटसृष्टीत काम करत गेली काही वर्षे घर खरेदी करता येत नव्हते. लोकांना इंडस्ट्रीतील अभिनेत्रींबद्दल गॉसिप करायला आवडतात. तसेच ते सर्वांना एकाच दृष्टिकोनातून बघतात. मी अभिनेत्री आहे म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. ही गोष्ट खूप दु:खद आहे. मला वाटायचे की मी असे काय केले आहे, ज्यामुळे मला अशी वागणूक मिळत आहे. जवळजवळ मला असे वाटत होते की मी गुन्हेगार आहे आणि मी या समाजातील नाही.
“अखेरीस एका सिंधी कुटुंबाने मी कुठल्या क्षेत्रात काम करते हे न पाहता मला घर विकले. माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझ्यासाठी हा स्वप्न सत्यात उतरण्याचा क्षण आहे. मी देवाचे आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानते”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.