बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदीने ‘विषकन्या’ (१९९१) आणि ‘जो जीता वही सिकंदर’ (१९९२) सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवली होती. तिच्या लूक आणि अभिनयामुळे ती अल्पावधीतच स्टार झाली. पण यशाच्या शिखरावर असताना तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता एका मुलाखतीत पूजाने अभिनय सोडण्यामागचं कारण सांगितलं.
अभिनेत्री आणि स्तंभलेखिका डॉ. शीन गुरीब यांच्या पॉडकास्टमध्ये पूजा बेदीने तिचे बालपण, करिअर पत्नी आणि आई म्हणून जबाबदाऱ्या आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. बॉलीवूड सोडण्याचं कारण विचारलं असता तिने पहिल्या पतीच्या रूढीवादी मुस्लीम कुटुंबाचा उल्लेख केला.
पूजा म्हणाली, “मी लग्नात १००% द्यायचं ठरवलं होतं. माझा एक्स पती, फरहान, एका अतिशय रूढीवादी मुस्लीम कुटुंबातला होता. त्यांच्या कुटुंबाची सून एक कधीही एका सेक्सी अभिनेत्री असूच शकत नाही. यावरून खूप वाद आणि चर्चा झाली आणि दोन्ही कुटुंबे आमच्या लग्नाच्या विरोधात होती. मला माझ्या कुटुंबात कोणताही संघर्ष नको होता, म्हणून मी सगळं सोडायचं ठरवलं.”
विरोध आणि इतर बऱ्याच अडचणी असूनही फरहान आणि पूजा यांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं झाली, पण नऊ वर्षांच्या संसारानंतर २००३ मध्ये ते वेगळे झाले. घटस्फोट हा पूजाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळांपैकी एक होता, कारण तिने खूप कमी काळात कुटुंबातील अनेक सदस्य गमावले. त्या काळात पूजा खूप खचली होती.
पूजा बेदीच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन
“माझं वय २७ होतं, तेव्हा पहिली घटना घडली. माझी आजी कर्करोगाने वारली, माझा कुत्रा वारला आणि लहानपणापासून मला वाढवणारा माणूसही सोडून गेला. माझ्या आईचं निधन झालं आणि माझ्या भावाने आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात माझं लग्न मोडलं. माझ्या पदरात दोन मुलं होती. तेव्हा मी ३२ वर्षांची होते. मी पूर्णपणे घाबरले होते, कारण मी घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही.”
पूजा पुढे म्हणाली, “दर सहा महिन्यांनी, कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून जात होती. त्या काळात मी कॉलम लिहायला सुरुवात केली आणि मग दुसरी गोष्ट घडली. त्यानंतर वर्षभराने मी मर्सिडीज चालवू लागले. माझ्या आणि माझ्या एक्स पतीत कोणताही राग किंवा नाराजी नव्हती. मी त्याचा व्यवसाय सुरुवातीपासून वाढवण्यास मदत केली, पण तरीही मला काहीही मिळालं नाही; मला घटस्फोट घ्यावा लागला. मी त्याच्याबरोबर राहू शकले असते किंवा माझ्या वाट्यासाठी लढू शकले असते, पण मला ते करायचं नव्हतं. ती पुढे जाण्याची वेळ आली होती आणि मी तसंच केलं.”
“तुम्ही एखाद्याबरोबर १२ वर्षे आनंदी होतात म्हणून तुम्हाला पुढील ५० वर्षे त्यांच्याबरोबर नाखूश राहणं गरजेचं नाही. तुम्हाला त्या गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे,” असं पूजा बेदीला वाटतं.
