Rajshri Deshpande Breast Cancer Diagnosis: ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री राजश्री देशपांडेने चाहत्यांबरोबर एक धक्कादायक बातमी शेअर केली. राजश्रीला ‘इन्फिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा’ म्हणजेच पहिल्या टप्प्याच्या स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. तिने पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती. पण यानंतर लोक शोकसंदेश पाठवत असल्याचा खुलासा राजश्रीने केला आहे.

एका नियमित तपासणीमुळे हा आजार वेळेत लक्षात आला, असं राजश्री देशपांडेने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. मी नियमित तपासणीसाठी गेले होते आणि डॉक्टरांना तिथे एक गाठ आढळली. मी छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला आले, डॉक्टरांना भेटले आणि ती गाठ नक्की कशाची आहे यासाठी पुन्हा एकदा सोनोग्राफी केली. सोनोग्राफीनंतर बायोप्सी केली आणि त्यानंतर मला हा आजार असल्याचं समजलं,” असं राजश्री देशपांडे म्हणाली.

३५ वर्षांनंतर प्रत्येक महिलेसाठी आवश्यक तपासणी

कर्करोगाबद्दल समजताच राजश्रीने याबद्दल मैत्रिणींना सांगितलं. “हे खूप दुर्दैवी आहे, कारण मी माझ्या अनेक मैत्रिणींना फोन केला, पण कोणीही आपली ब्रेस्ट चेकअप चाचणी करून घेतली नव्हती. ३५ वर्षांनंतर प्रत्येक महिलेसाठी ही तपासणी आवश्यक असते. त्यानंतर माझ्या मनात दुसरा विचार आला की, ‘गावाकडे याबद्दलच्या सुविधा तपासायला हव्यात’. गावात महिला दिवसभर घरकामात इतक्या व्यग्र असतात की, मॅमोग्राफी करण्याइतका वेळही त्या काढू शकणार नाहीत. मी माझ्या स्वतःच्या आरोग्याचा विचार तर करत होतेच, पण त्याचबरोबर इतरांचाही विचार करत होते.”

राजश्रीला वाटतं की ‘कॅन्सर’ या शब्दाभोवती असलेली भीती दूर होणं गरजेचं आहे. “चला, आपण हे नॉर्मलाइज करूया! कारण हा शब्द इतका मोठा टॅबू झाला आहे की, लोक शोकसंदेश पाठवल्यासारखे मेसेज करतात की ‘अरे देवा, खूप वाईट झालं’. पण आजकालच्या वैद्यकीय सुविधांमुळे, कॅन्सर किमान तुम्हाला त्यावर उपाय करण्यासाठी थोडा वेळ तरी देतो,” असं राजश्री देशपांडे म्हणाली.

कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करणार राजश्री

राजश्री गेल्या एक महिन्यापासून कॅन्सरशी लढा देत आहे, पण तिने या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा विचार सुरू केला आहे. “येत्या काही आठवड्यांत स्तनाच्या कर्करोगासंबंधित जागरूकता पसरवणाऱ्या कार्यशाळा घेतल्या जातील. एक कलाकार म्हणून मी माझ्या त्रासाचा वापर माझ्या कलेसाठी करते. अगदी त्याचप्रमाणे, मी या त्रासाचा वापर लोकांना जागरूक करण्यासाठी करेन,” असं राजश्री देशपांडे म्हणाली.

महिला दिन जवळ आहे, त्यानिमित्ताने राजश्रीने सर्वांना एक खास मेसेज दिला आहे. “या महिला दिनाला तुमच्या घरातील महिलांना सोनोग्राफी, पॅप स्मीअर टेस्ट आणि मॅमोग्राम टेस्ट गिफ्ट म्हणून द्या. मी माझ्या घरकाम करणाऱ्या महिलांना आणि असिस्टंटला आधीच सांगितलं आहे की, माझ्याकडून त्यांच्यासाठी हेच गिफ्ट असेल,” असं राजश्री देशपांडेने नमूद केलं.