अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करीत ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. आता तिने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ती मोठ्या चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिने तिचा अभिनयाचा प्रवास कसा होता, याबद्दल खुलासा केला आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

रकुल म्हणाली, “प्रभासबरोबर माझा पहिला तेलुगू चित्रपट होता. मी तोपर्यंत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नव्हते. त्या चित्रपटाचे चार दिवस शूटिंग झाले आणि माझ्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात घेतले गेले. जेव्हा इंडस्ट्री कशा प्रकारे काम करते हे तुम्हाला माहीत नसते, त्यावेळी तुम्ही काही गोष्टी मनाला लावून घेत नाही. निरागसता आणि भोळेपणामध्ये सौंदर्य असते.

“मी खूप भोळी होते. मी विचार केला की, त्यांनी मला चित्रपटातून काढलंय म्हणजे बहुतेक ते माझ्यासाठी नसावं. मी यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी करेन. कारण- माझ्यात भ्रष्टपणा नव्हता. जेव्हा तुमच्या सभोवतालचे लोक तुम्हाला कशामुळे काय झाले हे सांगतात, तेव्हा तुमच्या मनात विष भरलं जातं. मग तुम्ही वाईट विचार करायला लागता. पण, माझ्याभोवती अशी एकही व्यक्ती नव्हती. जेव्हा तुम्ही भोळे असता, तेव्हा त्याची तुम्हाला मदत होते.”

हेही वाचा: HIV पॉझिटिव्हची भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण बॉलीवूडने दिलेला नकार; पण, सलमान खानने होकार देत घेतले होते ‘इतके’ मानधन

तिला त्या चित्रपटातून का काढले? यावर बोलताना तिने म्हटले, “निर्मात्याला असं वाटलं की, नवीन अभिनेत्रीपेक्षा कोणीतरी अनुभवी कलाकार हवी. पण मला सांगितलंही गेलं नाही. हे सगळं घडल्यावर मी दिल्लीला परत गेले होते. मला चित्रपटातून बाहेर काढण्याचं कारण नंतर समजलं. हीच गोष्ट दुसऱ्या एका चित्रपटाच्या बाबतीतही झाली. पण, मी फक्त चित्रपट साइन केला होता, त्याचं शूटिंग सुरू झालं नव्हतं.”

पुढे बोलताना रकुलने म्हटले, “जेव्हा तुमच्याबरोबर दोन मोठ्या चित्रपटांच्या बाबतीत असं होतं, त्यावेळी तुमच्याबद्दल अंदाज बांधले जातात की, एक तर तुमचा अॅटिट्यूड चांगला नाही किंवा तुम्हाला अभिनय येत नाही. मला माहितेय की, मी मोठ्या चित्रपटांतून पदार्पण केले नाही. मी काही गोष्टींवर काम केलं आणि त्यानंतर मी एका छोट्या चित्रपटातून पदार्पण केलं; मात्र तो सिनेमा खूप गाजला होता.”

हेही वाचा: Video : कोकणातलं घर, भातशेती अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्याला दाखवलं निसर्गरम्य गाव अन् माहेरचं घर; पाहा व्हिडीओ

रकुलने याच मुलाखतीत खुलासा करत सांगितले की, तिच्या हातातून महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपटदेखील निसटला होता.

रकुलने म्हटले, “हा चित्रपट मी साइन केला होता. स्क्रिप्ट वाचायला सुरुवातदेखील केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या तारखा एका महिन्याने बदलल्या. मी त्यावेळी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्याबरोबर ब्रूस ली : द फायटर या चित्रपटाचे शूटिंग करीत होते. हा चित्रपट एका महिन्यात रिलीज होणार होता आणि त्याची दोन गाणी शूट व्हायची होती. तारखा जुळवू न शकल्यानं मला त्या चित्रपटातून बाहेर पडावं लागलं. दिशा पटानीनं जी भूमिका चित्रपटात साकारली आहे, ती मी करणार होते. इतका चांगला चित्रपट माझ्या हातातून गेल्यामुळे मला दु:ख झालं होतं. मी खूप रडले.”

‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत, कियारा अडवाणी दिशा पटानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.