Ramya Spandana Post On Dhurandhar 2 : रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या रणवीरच्या या चिपत्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिकची कमाई करत विक्रम रचला आहे. अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. पण एका अभिनेत्रीने ‘धुरंधर २’वर सडकून टीका केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रम्या स्पंदना.

रम्याने एक्सवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “मी आताच ‘धुरंधर २’ हा चित्रपट पाहिला आणि खरंच एखादी चांगली गोष्ट कशी कंटाळवाणी बनवायची याचं ‘धुरंधर २’ हे उत्तम उदाहरण आहे. हा चित्रपट पाहणे म्हणजे कंटाळवाण्या विषयाचं पुस्तक वाचल्यासारखं आहे. ज्यात न संपणारी प्रकरणे आहेत. शेवटी एका क्षणाला तुमचा मेंदू थकून जातो आणि हे काय चाललंय यावर हसायला येतं.”

पुढे ती म्हणते, “जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचाच असेल, तर स्वतःवर उपकार करा. चित्रपटगृहांत जाऊन वेळ किंवा पैसे वाया घालवू नका. हा चित्रपट फक्त ओटीटीवर किंवा फोनवर स्क्रोल करत पाहण्यासारखा आहे. खरंतर ओटीटीवर पाहणे जास्त योग्य, कारण कंटाळा आला तर लगेच बंद करता येतो. दिग्दर्शन, संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय हे सगळंच सरासरीपेक्षाही कमी वाटतं. ‘धुरंधर’ (भाग १) बघताना लोक जल्लोष करत होते, टाळ्या वाजवत होते, त्या चित्रपटात प्रेक्षक गुंतूले होते. पण ‘धुरंधर २’ पाहताना मात्र प्रेक्षकांमध्ये यापैकी काहीही नव्हतं.”

Award Banner

यानंतर ती रणवीर सिंहबद्दल म्हणते, “जे लोक म्हणत आहेत की, पूर्ण चित्रपट रणवीरने त्याच्या एकट्याच्या खांद्यावर पेलला आहे. पण त्याने नक्की असं काय केलं आहे? कारण, मला तर पूर्ण चित्रपटात फक्त त्याचे केसच दिसत होते. कदाचित त्याच्या केसांनाच ‘सहाय्यक पात्रा’चं नामांकन मिळायला हवं.”

यानंतर रम्या म्हणते, “चित्रपटातल्या हिंसाचाराबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट नसून जणू एखादी वस्तू शस्त्र कशी बनवायची याचं एक गाईडबुकच आहे. सुई, स्पॅनर, चाकू, साखळ्या, बंदुका, बॉम्ब… जे हातात येईल ते सगळं शस्त्र बनवलं आहे. दिग्दर्शक जणू स्वतःशीच स्पर्धा करत आहे की, पुढचा सीन आणखी किती हिंसक किंवा विचित्र बनवू? आणि हे इतकं वाढत जातं की, तुम्हाला धक्का बसण्याऐवजी हसू येऊ लागतं. एखाद्याचे पाय कापले, शरीर जळतंय… तरी तो माणूस संवाद बोलतोय. थोडक्यात सांगायचं तर, ‘धुरंधर २’ हा निराशाजनक चित्रपट आहे. जो कधी कंटाळवाणा वाटतो; तर कधी विनोदी… जर ‘धुरंधर’ पाहून तुम्ही खुश झाला असाल, तर हा दुसरा भाग पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की, हा चित्रपट का बनवला आहे?”

शेवटी तिने रणवीरला “तू यापेक्षा चांगला अभिनेता आहेस” असे सांगितलंय, तर आदित्य धरला “आंधळा राष्ट्रवाद आणि प्रोपगंडाचा काळ आता जुना झालाय, त्यातून बाहेर पडा” असा सल्ला दिला. दरम्यान, एकीकडे चित्रपटावर अशा टीका होत आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षकांचा मात्र चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.