Raveena Tandon On Relation With Akshay Kumar : ९० च्या दशकातल्या बॉलीवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रवीना टंडन. गेली अनेक वर्षं ती तिच्या अभिनयानं चर्चेत आहे. ती कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत अली आहे, विशेषत: अक्षय कुमारबरोबरच्या नात्याच्या चर्चांमुळे. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, नंतर अक्षय आणि शिल्पा शेट्टी यांच्यात जवळीक वाढली आणि रवीना-अक्षय वेगळे झाले, असंही म्हटलं जातं.
अक्षयबरोबरच्या नात्याबद्दल रवीनानं याआधीही तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. अशातच झूमच्या एका पॉडकास्टमध्ये तिने पुन्हा एकदा अक्षयबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली. दोघे ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. याच मुलाखतीत तिनं एकत्र काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला.
रवीना म्हणाली, “मला वाटतं की, आम्ही सगळे आता चांगले मित्र आहोत. त्यावेळी आम्ही सगळे तरुण होतो. आम्ही सगळे एकाच इंडस्ट्रीत आहोत. लिंक-अप, ब्रेक-अप, एकमेकांबरोबरचे रिलेशन्स… या गोष्टी कोणाच्या आयुष्यात झालेल्या नाहीत? आज मी आणि अक्षय मित्र आहोत. मी आणि शिल्पाही मैत्रिणी आहोत. आम्ही सगळे आमच्या आमच्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत.”
ती पुढे म्हणाली, “आमचं कुटुंब आणि मुलांसाठी आम्ही आनंदी आहोत. ‘वेलकम ३’चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. सेटवर आम्ही खूप एकमेकांबरोबर हसलो, खूप मजा केली. पुन्हा एकत्र काम करताना छान वाटलं. आम्ही सगळे आमच्या आयुष्यात एकमेकांसाठी आनंदी आहोत. मी आणि ‘अक्की’ (अक्षय कुमार) नेहमीच चांगले मित्र होतो. अजूनही आहोत.”
रवीना-अक्षयच्या नात्याबद्दल…
९० च्या दशकात रवीना आणि अक्षय ही जोडी खूप गाजली. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आणि त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांच्या ऑफस्क्रीन नात्याच्या चर्चाही सुरू झाल्या. दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्यासुद्धा आल्या होत्या. मात्र, त्याच काळात अक्षयचे इतर अभिनेत्रींबरोबर नाव जोडले जाऊ लागले. विशेषतः शिल्पा शेट्टीबरोबरच्या नात्यामुळे रवीना-अक्षय वेगळे झाले, असंही म्हटलं जातं
त्यावर काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, “आमचा ब्रेकअप २५-३० वर्षांपूर्वी झालाय, तरीही तो विषय पुन्हा पुन्हा पुढे येतो. मी त्याच्याबरोबरच्या रिलेशननंतर दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनमध्ये होते आणि अक्षयसुद्धा त्याच्या आयुष्यात पुढे गेला होता. मग एकमेकांविषयी मत्सर कशाचा? एक मोडलेला साखरपुडा अजूनही माझ्या नावाशी का जोडला जातो, हे मला समजत नाही.”
रवीना टंडनबद्दल थोडक्यात…
रवीना टंडनने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून सलमान खानबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘जिद्दी’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘खिलाडियों के खिलाडी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. वैयक्तिक आयुष्यात तिनं चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. त्यांना आता राशा आणि रणबीर अशी दोन मुलं आहेत.
