बॉलीवूडमध्ये यश मिळवणे कठीण आहेच, पण त्याहूनही कठीण आहे ते मिळवलेलं यश टिकवणे. असेच काहीसे घडले होते, अभिनेत्री रेखा यांच्या पहिल्या को-स्टारबरोबर. एकेकाळी त्यांची लोकप्रियता अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त होती. मात्र यश अन् प्रसिद्धीमुळे आलेल्या अहंकारामुळे त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले. कोण होते ते? चला जाणून घेऊ…

हे अभिनेते म्हणजे, नवीन निश्चल. जागरणच्या वृत्तानुसार, एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या नवीन यांनी मॉडेलिंगपासून सुरुवात केली. दिग्दर्शक मोहन सहगल यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुण्याच्या एफटीआयआय (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. मोहन सहगल यांनीच त्यांना ‘सावन भादों’ या चित्रपटातून ब्रेक दिला.

विशेष म्हणजे, हा चित्रपट नवीन निश्चल आणि रेखा या दोघांनीही चित्रपटातून पदार्पण केलं आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘सावन भादों’ हिट झाल्यानंतर नवीन निश्चल यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. त्यांनी ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘धुंद’ आणि ‘हंसते जख्म’सारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्याकाळात ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही मोठे स्टार मानले जात होते.

असे म्हटले जाते की, नवीन निश्चल जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. “अमिताभ हे एक छोटे कलाकार आहेत”, असे म्हणत त्यांनी ‘मेरे अपने’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘दीवार’सारखे चित्रपट नाकारले होते.

ते सेटवर को-स्टारचा आदर करत नसत आणि खूप नखरे दाखवत. मात्र, नंतर त्यांचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि त्यांचे स्टारडम संपले. यामुळेच त्यांना मुख्य अभिनेत्याच्या भूमिका मिळेनाशा झाल्या.

नवीन निश्चल यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ २००६ मध्ये सुरू झाला. त्यांच्या दुसऱ्या पत्नी, गीतांजली यांनी आत्महत्या केली. नवीन निश्चल यांनी दोन लग्ने केली होती. पहिले लग्न देव आनंद यांची भाची नीलू कपूर यांच्याशी झाले होते, पण त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी गीतांजली यांच्याशी दुसरे लग्न केले.

गीतांजली यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी सोडली होती, ज्यामध्ये त्यांनी नवीन निश्चल यांच्यावर छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केले होते. यामुळे नवीन आणि त्यांच्या भावाला पोलीस कोठडी झाली. मात्र, नंतर पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. २०११ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवीन निश्चल यांचे निधन झाले.