Bollywood Actress On Her Interfaith Marriage : बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांच्या लग्नाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचं वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू आहे. नुकतेच सागरिका-झहीर आणि हरभजन सिंग–गीत बसरा या जोड्या एकत्र आल्या आणि त्यांनी त्यांचं लग्न, नातं, तसेच एकमेकांचे धर्म यांबद्दल असलेल्या आदराविषयी मोकळेपणानं संवाद साधला.

Who’s The Boss? या यूट्यूब चॅनलवर झहीरनं सांगितलं की, डेटिंग सुरू होण्याआधी तो सागरिकाला बऱ्याच वर्षांपासून ओळखत होता; पण दोघांची वैयक्तिक ओळख नव्हती. त्याबद्दल “आमचे अनेक कॉमन मित्र होते; पण जेव्हा जेव्हा तिचं नाव निघायचं, तेव्हा तेव्हा मला एकच इशारा दिला जायचा की, तू जर तिच्याशी लग्न करणार असशील, तरच या नात्यात ये. तिचे सगळे मित्र मला हेच सांगायचे,” असं झहीर म्हणाला.

नंतर सागरिकानं सांगितलं की, झहीर सुरुवातीला तिला डेटबाबत विचारायला थोडा संकोच करीत होता. त्याबद्दल ती हसत हसत म्हणाली, “आम्ही जेव्हा जेवायला जायचो, तेव्हा माझ्याबरोबर नेहमी माझे दोन जवळचे मित्र असायचे. ते माझ्यासाठी बॉडीगार्डसारखेच होते. झहीरनं मला डेटसाठी विचारलं; पण त्याची एक अट अशी होती की, ही ‘खरी’ डेट असेल आणि त्या डेटवर ते दोन मित्र नसतील.”

“क्रिकेटपटू किंवा अभिनेत्याशी लग्न करायचं नव्हतं”

सागरिकानं हेही मान्य केलं की, सुरुवातीला तिला क्रिकेटपटू किंवा अभिनेत्याशी लग्न करायचं नव्हतं. “मी अगदी स्पष्ट होते. मला क्रिकेटपटू किंवा अभिनेत्याशी लग्न करायचं नव्हतं,” असं तिनं सांगितलं. मात्र, झहीरला भेटल्यानंतर तिचा विचार बदलला. नंतर झहीरनं आयपीएलदरम्यान गोव्यात सागरिकाला लग्नाची मागणी घातल्याचं सांगितलं.

“लोकांची पर्वा न करता, जे समाधान देतं ते करावं…”

पुढे क्रिकेटपटू हरभजन सिंगनं झहीरचं कौतुक करीत दोघांमधील परस्पर आदराबद्दल सांगितलं. गणपती उत्सवात झहीर स्वतः दिवा लावतो, हेही त्यानं नमूद केलं. त्यावर झहीर म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला सगळ्या धर्मांचा आदर करायला शिकवलं आहे. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता, जे मनाला समाधान देतं, ते करावं. ती (सागरिका) ज्या गोष्टीचा आदर करते, त्याचा आदर करणं हे माझंही कर्तव्य आहे. कारण- आम्ही दोघं नात्यात आहोत.”

पुढे झहीरनं सागरिकाच्या आई-वडिलांना भेटून लग्नाची मागणी घातल्याचा अनुभवही सांगितला. सागरिका म्हणाली, “माझे आई-वडील आधुनिक विचारांचे आहेत; पण परंपरांनाही ते महत्त्व देतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी ठरावीक पद्धतीनंच व्हायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं होतं”.

त्यानंतर पुढे झहीर म्हणाला, “सागरिकाच्या वडिलांना भेटायला जाण्याआधी तिनं मला थोडं घाबरवलं होतं; पण आमची भेट खूपच छान झाली. आमचं अर्धा तास भेटायचं ठरलं होतं; पण आम्ही दोन तास गप्पा मारल्या.” त्यावर सागरिका म्हणाली, “मी लहानपणापासून दिवाळी पूजा, गुढीपाडव्याची पूजा करत आले आहे. माझ्या आईला पाहून मी हे शिकले. झहीरला या सगळ्याचा खूप आदर आहे. खरं तर तो या सगळ्यात माझ्यापेक्षा जास्त सहभागी असतो.”