‘जिगरा’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकेतून अभिनेत्री शीबा आकाशदीप साबिर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, दिग्गज अभिनेते सुनील दत्त(Sunil Dutt) यांना अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा आवाज आवडत नसे, त्यांच्या आवाजाचा त्यांना तिरस्कार वाटत असे. त्यामुळे सुनील दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना १९७१ च्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटात त्यांना मुक्या व्यक्तीची भूमिका दिली होती. याबरोबरच शीबा आकाशदीप साबिर यांचे सासरे मनमोहन साबिर, ज्यांनी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सात हिंदूस्तानी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती, तेदेखील अमिताभ बच्चन यांच्या आवाजाबद्दल असेच म्हणायचे.

अभिनेत्रीने काय सांगितले?

सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, शीबा यांनी त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना काय म्हटले हे सांगितले. त्यांनी म्हटले होते, “एक हिरो यायचा आपल्या घरी आणि येऊन माझ्या पायाजवळ बसायचा, त्यावेळी मला त्याच्या आवाजाबद्दल वाटायचे याचा आवाज असा का घुमणारा आहे?”

“त्याचा आवाज अगदी रेडिओ जॉकीसारखाच येतो”

त्या पुढे म्हणतात, सुनील दत्त साहेबांनी मला म्हटले होते, आम्ही त्याच्या आवाजाचा तिरस्कार करतो. त्याचा आवाज अगदी रेडिओ जॉकीसारखाच येतो. त्यांनी अमिताभ बच्चन यांना रेशमा आणि शेरा चित्रपटात मुक्याची भूमिका करायला लावली. कोणालाच हे समजू शकले नाही की एक दिवस हा आवाज त्यांच्या स्वत:पेक्षा मोठा ठरेल. सुनील दत्त यांनी ‘रेशमा और शेरा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे.

गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजाचा गैरवापर होत असल्याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या परवानगीशिवाय नाव, आवाज आणि फोटो वापरून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची जाहिरात करण्यापासून संरक्षण मिळावे, असे त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.

हेही वाचा: Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. याबरोबरच ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वैट्टेयन’ या सिनेमात बीग बी रजनीकांत यांच्याबरोबर ३२ वर्षांनंतर दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कल्की: २८९८ एडी’ हा चित्रपट चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader