विवेक ओबेरॉय, सोमी अली असे अनेकजण सलमान खानमुळे करिअर संपलं असं जाहीरपणे सांगतात. तर बरेच कलाकार असेही आहेत, ज्यांना सलमान खानने संधी दिली. संघर्ष करत असताना काम दिलं. त्यामुळेच तो फक्त चाहत्यांचाही नाही तर सहकलाकारांचाही लाडका अभिनेता आहे.

बॉलीवूडच्या ‘भाईजान’ ने करिअरमध्ये कशी मदत केली, याबद्दल अनेकांनी सांगितलं आहे. शहनाज गिल त्यापैकीच एक होय. शहनाजने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सलमानचं कौतुक केलं. तसेच त्याच्या फार्महाऊसवर तो कसा वेळ घालवतो याबद्दल सांगितलं. फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सलमान खान निवांत असतो, असं ‘किसी का भाई किसी की जान’ च्या शूटिंगची आठवण करून देत शहनाज म्हणाली.

शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, सलमान खानने सिनेमातील सर्व कलाकारांसाठी फार्महाऊसवर एक पार्टी आयोजित केली होती. शहनाज गिलदेखील या पार्टीत गेली होती. ती सलमान खानच्या फार्महाऊसवर दोन दिवस राहिली होती.

शहनाज म्हणाली, “आम्ही सर्वांनी ‘किसी का भाई किसी की जान’च्या निर्मितीदरम्यान फार्महाऊसवर पार्टी केली होती. आम्ही दोन दिवस तिथे राहिलो आणि खूप मजा केली. आम्ही एटीव्ही चालवली. सलमान सर फक्त बेरीज तोडत होते. सर खूप चांगले आहेत. ते शेती करतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे सगळी उत्तम व्यवस्था आहे.”

फार्महाऊसवरील पार्टीत काय करतो सलमान खान?

सलमान खानच्या पार्टीबद्दल शहनाज गिल म्हणाली, “सलमान खान कामाबद्दल, अ‍ॅक्शन सीन कसे करायचे याबद्दल आणि त्यांच्या आगामी चित्रपटात ते काय करत आहेत, याबद्दल बोलतात. त्यांना चित्रपटांबद्दल खूप ज्ञान आहे आणि तेच सर्वांबरोबर शेअर करतात.”

शहनाज गिलचं करिअर

‘बिग बॉस १३’ मधून शहनाज गिलने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या व्यक्तिमत्त्वाने सलमान खानला प्रभावित केलं. बिग बॉसमध्ये शहनाजची दिवंगत सिद्धार्थ शुक्लाबरोबर चांगली मैत्री झाली होती. शोनंतरही ते दोघे एकत्र दिसायचे. तसेच बिग बॉसमध्ये आणि नंतरही सलमानने नेहमीच शहनाज गिलला खूप पाठिंबा दिला. तो अनेकदा शहनाजचं कौतुक करतो. त्याने शहनाजला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधीही दिली.

शहनाज गिलने २०२३ मध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याच वर्षी तिने भूमी पेडणेकरच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ मध्येही काम केलं होतं. २०२४ मध्ये शहनाजने ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली. ती सध्या ‘इक कुडी’ या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.