बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिला कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपलं मन मांडताना दिसते. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. नुकतंच तिने महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनाच्या निमित्ताने एक ट्वीट केले आहे. मात्र यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच तिने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्ताने ट्विटरवर एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये तिने “गांधी आम्हाला लाज वाटतेय, कारण तुमचे मारेकरी अजूनही जिवंत आहेत” असे म्हटले होते. याबरोबर तिने हॅशटॅग देताना गांधी जयंती आणि गांधीजी असे म्हटले होते आणि यामुळेच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
स्वरा भास्करने हे ट्वीट साधारण ११ वाजून ४० मिनिटांनी केले होते. त्यानंतर मात्र तिला तिची चूक लक्षात आल्यावर तिने ते ट्वीट लगेचच डिलीट केले. मात्र काही नेटकऱ्यांनी जुन्या ट्वीटचा स्क्रीनशॉट काढत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
स्वरा भास्करच्या या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत एकजण म्हणाला, “आधी जयंतीचे ट्वीट केले आणि आता पुण्यतिथी… बापू.” तर एकाने “दीदी थोडे वाचून ट्वीट करत जा” असा सल्ला तिला दिला आहे.
तर एकाने “तुझी नशा उतरली का?” असा प्रश्न तिला विचारला आहे. तर एकाने “पुण्यतिथीला जयंती सांगत तुम्ही तर गांधींनाच मारुन टाकलात?” असे म्हटले आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर स्वरा भास्करने ११ वाजता ५१ मिनिटांनी नवे ट्वीट शेअर केले. त्यात तिने गांधी आम्हाला लाज वाटतेय, कारण तुमचे मारेकरी अजूनही जिवंत आहेत, असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने गांधी पुण्यतिथी, गांधीजी असा हॅशटॅगही शेअर केला आहे.