Why Upasana Singh lost Maine Pyaar Kiya to Bhagyashree: सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ (१९८९) या चित्रपटाने सलमान खान आणि भाग्यश्री यांना रातोरात स्टार बनवलं. पण, भाग्यश्रीला निवडण्यापूर्वी ‘सुमन’ या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री उपासना सिंहला घेण्याचा निर्मात्यांनी विचार केला होता, याबद्दल फार कमी लोकांना माहितीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपासनाने ही भूमिका हातातून गेली, याबद्दल भाष्य केलं. तसेच या निर्णयानंतर तिने सूरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या यांना कसा जाब विचारला होता, याचाही खुलासा केला.
‘गॅलाट्टा इंडिया’शी बोलताना उपासना सिंहने ‘मैने प्यार किया’साठी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्याबरोबरच्या ऑडिशनची आठवण सांगितली. “तेव्हा मी चंदीगडमध्ये शिकत होते आणि माझी मावशी चेंबूरला राहायची. मला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा मुंबईत यायचे, तेव्हा या सर्व दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना भेटायचे,” असं उपासना सिंह म्हणाली.
सूरज बडजात्यांनी केलेली निवड
“अशाच एका भेटीदरम्यान माझी भेट गुप्ताजींशी (ते सूरज बडजात्यांचे काम पाहायचे) झाली. त्यांनी मला सांगितलं की, राजश्री प्रोडक्शन ‘मैने प्यार किया’ नावाचा चित्रपट बनवत आहे आणि ते माझी भेट सूरज बडजात्यांशी करून देतील. मी त्यांना सांगितलं की मी लहानपणापासून नाटक करतेय आणि मला अभिनय करायचाय. सूरज बडजात्या माझी कोणतीही मोठी ऑडिशन घेतली नाही, फक्त ३-४ डायलॉग्स बोलून दाखवायला सांगितले. त्यांना मी आवडले आणि त्यांनी गुप्ताजींना सांगितलं की मी हिला सिनेमात घेतोय,” असं उपासना सिंह म्हणाली.
मी चित्रपट पाहायला गेले नाही, कारण… – उपासना सिंह
उपासना सिंहने आपले वडील राजकुमार बडजात्या यांना भेटावं, अशी सूरज यांची इच्छा होती. उपासना म्हणाली, “सूरजजींना वाटत होतं की मी त्यांच्या वडिलांनाही भेटावं. त्यानंतर गुप्ताजींनी मला फोन करून सांगितलं की सूरजजींनी तुला निवडलंय. मग मी त्यांच्या वडिलांना भेटले. त्यानंतर मी चंदीगडला परत गेले, पण मला पुढे कधीच फोन आला नाही. नंतर तो चित्रपट तयार झाला. मी खूप दिवस तो चित्रपट पाहायला गेले नाही, कारण मीच त्या चित्रपटाची हिरोईन होते आणि माझ्याशिवायच तो सिनेमा बनला, या गोष्टीमुळे मी नाराज होते. माझी निवड झाली होती हे मी कोणालाच सांगितलं नाही, कारण मला ते अपमानजनक वाटत होतं.”
सर्वांसमोर उपासना सिंहने राजकुमार बडजात्यांना विचारलेला जाब
उपासनाचा राजकुमार बडजात्यांना जाब विचारण्याचा कोणताही हेतू नव्हता, पण ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एक खुलासा केला होता. त्यामुळे उपासनाला राग आला आणि ती सर्वांसमोर भडकली. “काही वर्षांनंतर मी सूरजजींबरोबर ‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ हा चित्रपट केला. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करत होतो आणि तेव्हा सूरजजींच्या वडिलांनी सर्वांसमोर सांगितलं की, ‘मैने प्यार किया’साठी मला निवडलं होतं, मी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते माझं नाव घेतील असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांनी घेतलं. हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मग सर्वांनी मला का घेतलं नाही, ते विचारलं. त्यावेळी मला राग आला आणि मीही विचारलं की माझी निवड होऊनही तुम्ही मला का घेतलं नाही? त्यावर ते म्हणाले की माझी उंची सलमान खानपेक्षा जास्त होती. मी म्हटलं, ‘श्रीदेवीची उंचीही त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण ती त्याच्याबरोबर काम करतेय ना? मला मूर्ख बनवू नका!’ तेव्हा ते म्हणाले, ‘जर आम्ही तुला घेतलं असतं, तर तूही श्रीदेवीसारखीच इंडस्ट्री सोडून गेली असतीस,'” अशी आठवण उपासना सिंहने सांगितली.
मला वाटलं मी भाग्यश्रीला शिव्या घालेन- उपासना सिंह
ती पुढे म्हणाली, “त्या वेळी मला खूप वाईट वाटलं होतं. तो इतका उत्तम चित्रपट होता, पण मी बराच काळ तो पाहिला नाही. मला वाटायचं की मी तो बघायला गेले तर भाग्यश्रीला शिव्याच घालेन. पण, तिने खूप छान काम केलं आणि ती त्या भूमिकेसाठी योग्य होती, मात्र मी तिच्यापेक्षा जास्त त्या भूमिकेसाठी पात्र होते. याबद्दल सलमानलाही माहीत होतं.”
‘मैने प्यार किया’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, भाग्यश्री, रीमा लागू, आलोक नाथ आणि मोहनीश बहल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने सलमान खानच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
