घराणेशाही हा कला क्षेत्रातला कायमच चर्चेचा मुद्दा आहे. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेकांनी या घराणेशाहीबद्दल आपापली मतं व्यक्त केली आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना या घराणेशाहीचा फायदा झाला आहे. घराणेशाहीने बॉलीवूडला अनेक स्टारकिड्स दिले आहेत. मात्र या घराणेशाहीमुळे एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलाला काहीच फायदा झाला नाही असं तो स्वत: म्हणाला आहे.

आई-वडील दोघेही कला क्षेत्रातले असूनही एका अभिनेत्याचा मनोरंजन क्षेत्रातला संघर्ष हा अजूनही संपलेला नाही आणि हा अभिनेता म्हणजे अध्ययन सुमन. अध्ययन सुमन हा प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आहे. २०२४ मध्ये अध्ययन संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’मध्ये दिसला होता. परंतु तेव्हापासून तो कोणत्याही चित्रपट किंवा सीरिजमध्ये दिसला नाही.

‘हिरामंडी’सारख्या गाजलेल्या सीरिजमध्ये काम केल्यानंतरही त्याला अपेक्षित काम न मिळाल्याबद्दल अभिनेत्याने त्याची खंत व्यक्त केली आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन म्हणाला, “मी घराणेशाहीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. कारण घराणेशाहीमुळे मला कोणतेही काम मिळाले नाही आणि मी ते सिद्ध करू शकतो. मला घराणेशाही ही एक निरर्थक चर्चा वाटते.”

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’मधील भूमिकेबद्दल त्याने सांगितलं, “मला वाटले होते की, या सीरिजनंतर माझे नशीब बदलेल आणि मला चांगले काम मिळेल, चांगल्या भूमिका मिळतील. पण असे काहीही घडले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून विचार करत आहे की, मला चांगली संधी मिळत नाहीये.”

यापुढे तो म्हणाला, “मला आज देशातील सर्वात मोठे चित्रपट निर्माते श्री. संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, माझ्या कामाचं कौतुक झालं आणि माझ्याबद्दल खूप काही बोललं गेलं. पण तरीही या भूमिकेनंतर मला काम मिळालं नाही. याचा दोष मी कोणाला देऊ? स्वतःला की इंडस्ट्रीतील लोकांना?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे त्याने सांगितलं, “मी जरी एक भव्य आणि ऐशोआरामाचं जीवन जगत असलो, तरी ते माझ्या वडिलांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही गाडी खरेदी केली, घर खरेदी केले. पण ते तुमचं होत नाही, ते तुमच्या वडिलांचे आहे. ते त्यांचे कष्ट आहेत. कधीकधी मला वाटतं की, वयाच्या ३७ व्या वर्षी माझ्याकडे स्वत: घरही नाही.”