Adinath Kothare shares Experience of Ramayana Movie: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण पार्ट १’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. आता मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेने सिनेमात काम करण्याचा अनुभव कसा होता, सिनेमात कशी निवड झाली याबद्दल वक्तव्य केले आहे.
“मी आई-वडिलांना सांगितलं होतं की…”
आदिनाथने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत आदिनाथ कोठारेने रामायण सिनेमाच्या सेटवरचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “‘रामायण’मधील माझा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. तो अनुभव प्रत्यक्ष घेतलाच पाहिजे. चित्रपटाचं भव्य स्वरूप आणि त्याचं महत्त्व मला पहिल्याच दिवशी जाणवलं. “
एक किस्सा सांगत तो म्हणाला, “आम्ही अयोध्येतील एका प्रसंगाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी रणबीर कपूर, रवी दुबे, साई पल्लवी, अरुण गोविल यांच्यासह इतर सगळे कलाकार उपस्थित होते. त्या सेटवर उभं राहून पहिला सीन साकारताना आम्ही अभिनयावर लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र, तिथून बाहेर पडून घरी गेल्यानंतर आपण नेमकं काय केलं, याची जाणीव झाली. मला आठवतंय, मी आई-वडिलांना सांगितलं होतं की, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. देशातील काही सर्वोत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ही खूप आनंदाची गोष्ट होती.”

पुढे तो म्हणाला, “पहिल्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो. सुरुवातीच्या काही दिवसांत कलाकार म्हणून आपण त्या व्यक्तिरेखेला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सेटवर स्वतःला कसं वावरायचं, इतर कलाकारांबरोबरच नातं कसं असेल, याचा अंदाज घेत असतो. सेटवर सहज वावरता यावं यासाठी प्रयत्न करत असतो. एकदा आम्ही एका सीनसाठी उभे होतो. त्यावेळी मी, श्रीराम, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे सगळे जण तिथे होतो. आम्हाला एका गोष्टीकडे पाहून त्यावर रिअॅक्शन द्यायची होती. आम्ही त्या सीनचा सराव केला होता. त्यावेळी माझ्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार आला होता; पण मी घाबरलो होतो. त्यामुळे नितेश सरांनी सांगितल्याप्रमाणेच करत होतो. शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी जे करण्याचा विचार करत होतो, तेच करण्याचा सल्ला दिला. मी तसं केलं आणि शॉट संपल्यानंतर नितेश सरांनी मोठ्याने माझं कौतुक केलं. त्या क्षणामुळे माझा संकोच दूर झाला आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग झालो.”

‘रामायण’च्या सेटवर मोबाईल फोन वापरण्यास होती बंदी
‘रामायण’च्या सेटवर पाळल्या जाणाऱ्या नियमांबद्दलही आदिनाथने सांगितलं. तो म्हणाला, “’रामायण’चा सेट अतिशय शिस्तबद्ध होता. तिथे मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नव्हती. ही शिस्त एका पवित्र शक्तीचा भाग असल्यासारखी होती, जिने प्रत्येकाला एकत्र बांधून ठेवलं होतं. ‘रामायण’च्या सेटवर पाऊल ठेवलं म्हणजे मंदिरात आल्यासारखं वाटत असे. कॅमेरे सुरू नसतानाही तिथे शिस्त पाळली जात होती. मी आजवर काम केलेल्या सेटपैकी हा सर्वात उत्तम आणि शांत सेट होता. हा अनुभव खूप सुंदर होता.”
रामायण सिनेमातील भूमिकेसाठी वैयक्तिक पातळीवर कोणती तयारी केली होती, याबद्दलही आदिनाथने सांगितलं. तो म्हणाला, “जगातील सर्वोत्तम टीम या चित्रपटावर काम करत होती. माझ्याबद्दल बोलायचं तर मी अभिनयाची वेगळी पद्धत ठरवली नव्हती. कारण नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्यासारख्या अनुभवी लोकांनी या चित्रपटासाठी खूप संशोधन केलं आहे आणि बराच वेळ दिला आहे. ते गेल्या १० वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. नितेश सर २०१६ किंवा २०१७ पासून या पटकथेवर काम करत आहेत. त्यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये घेतलेली मेहनत दिसून येते. त्यामुळे त्यांनी जसं मार्गदर्शन केलं, तसं मी माझं काम केलं.”
तो असेही म्हणाला, “या चित्रपटासाठी अनेक दिवस तयारी सुरू होती. वर्कशॉप घेतले. त्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली. मी आजवर ऐकलेल्या सर्वोत्तम पटकथांपैकी ही एक आहे, याची मला खात्री आहे. या चित्रपटात काम करणे, हा माझ्यासाठी खूप काही शिकवणारा अनुभव होता. भारतातील सर्वात मोठा चित्रपट तयार होताना पाहणं आणि त्याचा एक भाग होता येणं, ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची आणि भाग्याची गोष्ट आहे.”

दरम्यान, ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता, यश रावण, रवी दुबे लक्ष्मण, आदिनाथ कोठारे भरत, अनुपम खेर जटायू, लारा दत्ता कैकेयी, अरुण गोविल दशरथ, रकुल प्रीत शूर्पणखा आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.
