Aditi Rao Hydari Cannes Film Festival 2026 Look : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा ‘जलवा’ दिसून येत आहे. अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता ‘हीरामंडी’फेम अभिनेत्रीने कान्स फेस्टिवलमध्ये लक्ष वेधले. अभिनेत्री अदिती राव हैदरीने कान्स फेस्टिव्हलमध्ये दोन लूक केले आहेत. एकामध्ये तिने रॉयल मुघल कलेचे प्रतिक असणारी साडी परिधान केली. दुसऱ्या लूकमध्ये तिच्या निलॉन रंगाच्या वन पीसमधील ग्लॅमरस लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या असल्याचे दिसून येत आहे. सौंदर्य आणि रॉयल अदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अदितीच्या कान्स रेड कार्पेट लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कान्सच्या फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलीवूड सेलिब्रेटींची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर तेच कान्स लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यावेळी तिने घातलेला वन-शोल्डर गाऊन चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

निलॉन रंगामुळे रेड कार्पेटवर आदिती उठून दिसत होती. तिच्या गाऊनच्या अर्ध्या भागावर डिटेल डिझाइन करून, त्याला खाली लाँग कट देण्यात आला होता. बोल्ड आणि स्टायलिश लूकमध्ये अदितीचे सौंदर्य आणखी खुलले होते. मिनिमल ज्वेलरीसह मोकळे वेव्ही पद्धतीने हेअरस्टाईल करून आदिती राव हैदरीने लूक पूर्ण केला.


मिनिमल मेकअप अन् डायमंड नेकलेस

अदितीच्या मेटॅलिक फिनिश आणि स्ट्रक्चर्ड डिझाईन गाऊनमुळे ती रेड कार्पेटवर उठून दिसत होती. तसेच तिने एक डायमंड असलेला नेकलेस परिधान केला होता. मिनिमल मेकअप असलेला आदिती राव हैदरीचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. इन्स्टाग्रामवर फ्रेंच रिव्हिएरामधील फोटो शेअर करीत अदितीने लिहिले, “आपण याला पात्र आहोत! कान्स मूड.”

मुघल शैलीने प्रेरित सिग्नेचर साडी

कान्स रेड कार्पेटवरील उपस्थितीपूर्वी अदितीने कान्स २०२६ मधील तिचा आणखी एक लूक शेअर केला होता, ज्यामध्ये अदितीची ही सिग्नेचर साडी शँपेन सिल्क टिशू फॅब्रिकपासून बनवलेली होती आणि ती मुघल वास्तुकलेत आढळणाऱ्या चारबाग या पारंपरिक चार भाग असलेल्या बागशैलीपासून प्रेरित होती. ‘जेड बाय मोनिका अँड करिश्मा’ने डिझाईन केलेल्या या आयव्हरी आणि सोनेरी रंगाच्या साडीवर मुघलकालीन शैलीतील नाजूक कलाकुसर होती. तिची ही शैली साधी आणि आकर्षक होती.

अदिती राव हैदरी ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचे सौंदर्य, एलिगंट अंदाज आणि दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करतात. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. विशेषतः या सीरिजमधील तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. अलीकडेच अदिती राव हैदरी ‘गांधी टॉक्स’मध्ये झळकली होती. या चित्रपटात ती विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.