कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १३ मे २०२५ रोजी सुरू झालेला हा महोत्सवाची २४ मे २०२५ रोजी सांगता होईल. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर जगभरातून अनेक सेलेब्रिटी हटके अंदाजात हजेरी लावतात. यामध्ये अनेक भारतीय कलाकारही सहभागी होत असतात. यंदाचा ७८ वा कान्स फिल्म फेस्टिव्हल असून यावेळी सुद्धा अनेक भारतीय कलाकार वेगवेगळ्या अंदाजात तेथील रेडकार्पेटवर फोटो काढत, पोज देताना दिसले.

अशातच आता या महोत्सवाला बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अदितीसाठी कान्स फिल्म फेस्टिव्हल तसा नवीन नाही. परंतु, यावेळी तिने वेगळ्याच अंदाजात कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. अदितीने नुकतेच तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने पारंपरिक लूकला पसंती दिली आहे. अदितीने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिने परिधान करत भांगेत कुंकू भरलंय. त्यामुळे तिच्या या लूकने साऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

कान्सच्या रेडकार्पेटवर तिने भारतीय पोशाखाला पसंती देत नेहमीपेक्षा काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी तिने फ्रेंच रिव्हिएरा येथे समुद्रकिनारी फोटोशूट केलं. तिने तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. यासह तिचा नवरा सिद्धार्थने सुद्धा या फोटोंवर कमेंट केली आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरीचा नवरा सिद्धार्थची कमेंट

अदिती राव हैदरीसह, ऐश्वर्या राय बच्चन, जान्हवी कपूर, उर्वशी रौतेला, शाहरुख खान, इशान खट्टार, यांसारख्या अनेक कलाकारांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. तर शाहरुख खान, जान्हवी कपूर, इशान खट्टर यांची कान्समध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकापेक्षा एक अशा वेगळ्या अंदाजाच वेगवेगळ्या भाषेतील कलाकार कान्समध्ये हजेरी लावत असतात आणि हीच त्याची खासियत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदिती राव हैदरीच्या कान्समधील प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०२२ साली पहिल्यांदा कान्समध्ये हजेरी लावत पदार्पण केलं होतं. त्यावेळी तिने सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी नेसली होती. तेव्हापासून अदिती दरवर्षी कान्सच्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असते. याव्यतिरिक्त सुद्धा अदितीच्या फॅशन स्टाईलसाठी तिचे चाहते नेहमीच तिला दाद देत असतात.