चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत, ज्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत आपली स्वप्ने पूर्ण केली. त्यापैकीच एक नाव म्हणजे आदित्य धर. सध्याच्या घडीला आदित्य हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आहे. त्याच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे.

आदित्यला ‘डिस्लेक्सिया’ नावाचा आजार होता. त्यामुळे त्याला वाचण्यात, लिहिण्यात आणि शब्द समजून घेण्यात अडचणी येत असत. असं असूनही त्याने खचून न जाता मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

आदित्य धर याचा जन्म १२ मार्च १९८३ रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्याला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये रस होता. पण शिकत असताना डिस्लेक्सियामुळे त्याला अडचणी आल्या. मात्र त्याने शिक्षण सोडलं नाही. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक केलं आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

Award Banner

रेडिओ जॉकी म्हणून केलं काम

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने रेडिओ जॉकी (RJ) म्हणून काम केलं. त्यानंतर तो फिल्म इंडस्ट्रीत आला. त्याने ‘काबुल एक्सप्रेस’, ‘डॅडी कूल’ आणि ‘हाल-ए-दिल’ सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्याने पटकथा लेखनही केलं. तसेच ‘तेज’ आणि ‘आक्रोश’ सारख्या चित्रपटांसाठी लेखक म्हणून काम केलं. अनेक वर्षे लेखक आणि गीतकार म्हणून काम केल्यावर आदित्यने दिग्दर्शन करायचं ठरवलं.

आदित्य ‘रात बाकी’ नावाचा चित्रपट करणार होता. त्यात कतरिना कैफ व फवाद खानला घ्यायचं ठरलेलं. पण राजकीय कारणामुळे चित्रपट बनू शकला नाही. मग आदित्यने दुसऱ्या कथेवर काम केलं आणि २०१९ मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ बनवला. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३४२ कोटींची कमाई केली.

पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’च्या यशानंतर आदित्य धर इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या यादीत सामील झाला. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने अनेक नवीन प्रोजेक्ट करायचं ठरवलं, पण बजेट आणि इतर काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यानंतर २०२५ मध्ये त्याचा ‘धुरंधर’ चित्रपटा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले.

३ चित्रपटांनी कमावले १,८२० कोटी रुपये

आता आदित्य धर त्याच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ५० कोटी रुपये कमावले आहेत. आदित्य धरच्या ३ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण १,८२० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. सध्या आदित्य सर्वात यशस्वी बॉलीवूड दिग्दर्शक आहे.

आदित्य धरने बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमशी लग्न केलं असून त्यांना एक मुलगा आहे.