अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्य व वादांमुळेही खूप चर्चेत असते. कंगना रणौतचं नाव हृतिक रोशन व आदित्य पंचोलीशी जोडलं गेलं होतं. आदित्य कंगनापेक्षा वयाने बराच मोठा व विवाहित होता. दोघे जवळपास पाच वर्षे एकत्र होते, असं म्हटलं जातं. दोघांमध्ये कटुता आल्यावर कंगना व आदित्य यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. “मी १७ वर्षांची असताना या माणसाने माझ्या डोक्यावर जोरात मारलं होतं, माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. मग मी माझी चप्पल काढून त्याच्या डोक्यावर जोरात मारली होती,” असं कंगनाने आदित्यवर आरोप करताना म्हटलं होतं.
कंगनाने केले होते आरोप
कंगनाने एका मुलाखतीत दावा केला होता की, तिच्या वडिलांच्या वयाच्या आदित्य पंचोलीने तिला घरात कोंडून ठेवलं होतं. म्हणून तिने स्वतःला वाचवण्यासाठी पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली होती. तिने त्याच्या पत्नीवरही आरोप केले होते. कंगनाने आदित्यवर शारीरिक शोषणाचा आरोप करत तक्रारही दाखल केली होती. तेव्हा आदित्य पांचोली ४३ वर्षांचा होता आणि कंगना रणौत २१ वर्षांची होती. त्यांचे पाच वर्षांचे नाते संपल्यावर आपण कंगनाला विसरल्याचं आदित्यने म्हटलं होतं. त्याला फक्त कंगनाला दिलेले पैसे परत हवे होते.
कंगनाने घर खरेदी करायला मागितलेले १ कोटी?
“आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना भेटलो नव्हतो. पण काही काळापूर्वी तिने मला फोनवर सांगितलं होतं की तिला घर खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपये पाहिजेत. तिने माझ्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर हे घडलं. मी माझ्या एका बँकर मित्राला फोन केला आणि नंतर कंगनाचा जामीनदार झालो आणि तिला ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच मी स्वतःजवळचे ५५ लाख रुपये तिला दिले होते. त्यापैकी तिने मला २५ लाख परत केले आणि ३० लाख अद्याप दिलेले नाही,” असं आदित्यने म्हटलं होतं.
आदित्य पंचोलाली कंगना केव्हा भेटली होती?
आदित्य पंचोलीने म्हटलं होतं की तो कंगनाला २७ जून २००४ रोजी भेटला होता. “आशा चंद्र अॅक्टिंग इन्स्टिट्यूटच्या बाहेर ती एका मुलाच्या बाईकवर बसली होती. तेव्हा तिथे एका इमारतीचं काम सुरू होतं, त्यामुळे मी तिथे होतो. त्या दिवशी तिथे खूप पाऊस सुरू होता. कंगना माझ्या जवळ आली आणि तिने मला प्रेमाने हाय म्हटलं. मग त्याने मला तिचं नाव कंगना आहे, असं सांगितलं. तिने माझ्याकडून मदत मागितली. मग ती मला खूप फोन करायची. मग आम्ही भेटलो. ती एका लहान शहरातली प्रेमळ मुलगी होती. मी तिच्या प्रेमात पडलो,” असं आदित्य पंचोलीने म्हटलं होतं.

