Sunny Deol’s Border 2 Is Banned In Gulf Countries : सनी देओलची मुख्य भूमिका असलेला ‘बॉर्डर २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अनेक लोकप्रिय अभिनेते महत्त्वपूर्ण भूमिकांमधून पाहायला मिळतात. परंतु, असं असताना या चित्रपटाला काही देशांमध्ये मात्र बंदी आहे.
अलीकडेच आदित्य धरचा ‘धुरंधर’, श्रीराम राघवन यांचा ‘इक्कीस’ आणि आता ‘बॉर्डर २’ असे तीन युद्धपट एकापाठोपाठ प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’वरही काही देशांमध्ये बंदी होती. अशातच आता सनी देओलच्या ‘बॉर्डर २’लाही काही देशांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी परवानगी नाहीये. नेमक्या कोणत्या देशांमध्ये ‘बॉर्डर २’वर बंदी आहे याबद्दल जाणून घेऊयात…
‘बॉर्डर २’ने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने सॅकनिल्कच्या वृत्तानुसार ३० कोटींची, दुसऱ्या दिवशी ३६ कोटींची कमाई केली; तर आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण ८९.६६ कोटींची कमाई केली आहे. ‘बॉर्डर २’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असला तरी काही देशांमध्ये प्रदर्शनावर बंदी असल्यामुळे या चित्रपटाला फटका बसला असल्याचंही म्हटलं जात आहे. ‘धुरंधर’प्रमाणे ‘बॉर्डर २’वर गल्फ देशांमध्ये बंदी आहे.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार ओमान, कतार, कुवैत, बहरीन, सौदी अरब आणि यूएईमध्ये सनी देओलच्या ‘बॉर्डर २’वर बंदी आहे. बऱ्याचदा भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारित चित्रपटांच्या प्रदर्शनावर या देशांमध्ये बंदी असते. या देशांमध्ये जरी चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘धुरंधर’सुद्धा या देशांमध्ये प्रदर्शित झाला नव्हता, परंतु ‘धुरंधर’ने जगभरात कोट्यावधींची कमाई केली.
दरम्यान, अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ हा जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. सनी देओल, वरूण धवन, दलजित दोसांझ, आहान शेट्टी हे कलाकार या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहेत. २३ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
