दिलजीत दोसांजची प्रमुख भूमिका असलेला सतलज हा चित्रपट ओटीटीवर रिलिज करण्यात आला होता. ज्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये हा चित्रपट हटवला गेला. ही बातमी ताजी असतानाच आता श्रेयस तळपदेचा द इंडिया स्टोरी : स्लो पॉयझन इन प्रोग्रेस हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाचा टीझर रिलिज झाला आहे. ज्यावरुन हे कळतं की हा एक कोर्टरुम ड्रामा आहे. तसंच लोकांच्या आरोग्याशी संबंधित खाद्यपदार्थांवर तसंच भेसळीवर हा सिनेमा भाष्य करतो. या चित्रपटाला अ‍ॅग्रो केमिकल इंडस्ट्रीने विरोध दर्शवला आहे. २४ जुलैला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता नवा वाद सुरु झाला आहे.

अ‍ॅग्रो केम फेडरेशन ऑफ इंडियाने काय म्हटलंय?

नवी दिल्लीतल्या अ‍ॅग्रो केम फेडरेशन ऑफ इंडियाने (ACFI) म्हटलं आहे की या चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की ८५ टक्के भारत हा शेती संबंधीच्या रासायनिक क्षेत्राशी संबंधित आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन म्हणजेच चित्रपटाला प्रमाणपत्र देणाऱ्या बोर्डाने या चित्रपटात काय काय गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आणि त्यात खरंच तथ्य आहे का? याचा पडताळा केला पाहिजे. ACFI चे महासंचालक कल्याण गोस्वामी म्हणाले मी या चित्रपटाचा टीझर पाहिला आहे. जो दिशाभूल करणारा आहे असं वाटतं आहे. या चित्रपटाच्या टिझरमध्ये अन्न सुरक्षा, पेस्ट्रिसाइड्स आणि भारतीय शेती पद्धतीवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र ते दाखवताना सत्यता बाजूला ठेवली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईतूनही चित्रपटाच्या निर्मात्यांना धाडण्यात आली नोटीस

दिल्लीत ही घडामोड घडलेली असताना मुंबईतल्या भावेश जोधा यांच्या अ‍ॅग्री बिझनेस सेंटरचे वकील हिरण्य पांडे यांनी या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या चित्रपटात मृत्यूदाता आणि अन्नदाता सारख्या शब्दांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. ज्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना नोटीस बजावली आहे असं हिरण्य पांडेंनी सांगितलं. हिरण्य पांडे म्हणाले आहेत की या चित्रपटात जे शब्द वापरण्यात आले आहेत ते शब्द प्रतीकात्मक, नाट्यमय रुपांतर आहेत असं टिझरमध्ये सांगण्यात आलं आहे असं उत्तरही निर्मात्यांनी दिलं आहे. अमुक एका गोष्टीमुळेच कर्करोगासारखा गंभीर रोग होतो हे दाखवण्यात आलं आहे पण ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे त्यामुळे आम्ही हा आक्षेप घेतला आहे.

द इंडिया स्टोरीच्या टिझरमध्ये काय दाखवण्यात आलं आहे?

एका मुलीचा मृत्यू कर्करोगाने होतो. त्या मुलीचा मृत्यू ही हत्या आहे असं सांगितलं जातं आणि खटला उभा राहतो. कारण तिने खाल्लेलं अन्न भेसळयुक्त आहे असा दावा करण्यात येतो. श्रेयस तळपदेने मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर काजल अग्रवालने वकिलाची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटामुळे वाद सुरु झाला आहे. आता नेमकं चित्रपटाचं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.