Kalpana Iyer on Quit Bollywood: सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी यशाच्या शिखरावर असताना अभिनय सोडला आणि वेगळा मार्ग निवडला. काहींनी विदेशात स्थलांतर केले.

आता सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळते. बॉलीवूड सोडलेले कलाकार आता काय करतात, कुठे राहतात, त्यांचे आयुष्य कसे असते, याबद्दल माहिती मिळते.

‘रंबा हो हो हो’ फेम अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ झालेला व्हायरल

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात त्यांनी रंभा हो हो हो या गाण्यावर डान्स केला होता. ६९ व्या वर्षीदेखील त्यांच्यातील एनर्जी पाहून नेटकरी थक्क झाले होते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. फक्त चाहत्यांनीच नाही तर कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या उत्साहाचे आणि एनर्जीचे कौतुक केले होते.

ज्या गाण्यामुळे कल्पना अय्यर पुन्हा एकदा चर्चेत आल्या, एकेकाळी त्याच गाण्यातून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. १९८१ ला प्रदर्शित झालेल्या अरमान या चित्रपटातील ‘रंबा हो हो हो’ या गाण्यामुळे कल्पना अय्यर घराघरात पोहोचल्या होत्या. कल्पना अय्यर यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात सत्ते पे सत्ता, बडे दिलवाला, हम पाँच, लाडला, अंजाम अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. हम साथ साथ हैं या सुपरहिट चित्रपटातील संगीता या भूमिकेसाठी त्या विशेष लक्षात राहिल्या.

“माझ्याकडे कधीच कोणी…”

१९९९ नंतर कल्पना अय्यर यांनी बॉलिवूड सोडले आणि त्या दुबईला स्थायिक झाल्या. आता कल्पना अय्यर यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बॉलीवूड सोडण्याचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या, “नंतरच्या काळात खूप गोष्टी बदलल्या. कास्टिंग एजंट, सेक्रेटरी आणि मॅनेजर आले. माझ्याकडे कधीच कोणी नव्हते. मी नेहमीच माझे काम स्वतःहून करायचे किंवा माझी आई आणि बहीण माझ्या कामाच्या गोष्टी मॅनेज करायचे.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या,”सगळीकडे तेच तेच लोक दिसू लागले.लोकांचे गट तयार झाले. मी कोणत्याच गटाचा भाग नव्हते. मी इंडस्ट्रीतल्या किंवा टीव्हीच्या गटातही नव्हते. त्यावेळी मला ज्या कामाच्या ऑफर मिळत होत्या, त्यामुळे मी आनंदी नव्हते. तर मी पुढे काम करण्यात काय अर्थ होता?”

“मुंबईतील अर्ध्याहून जास्त लोक…”

आता काम करण्याची इच्छा असल्याची इच्छा व्यक्त करत कल्पना अय्यर म्हणाल्या, “मी फार दूर राहत नाही. कोणीही माझ्याशी संपर्क साधू शकते. मुंबईतील अर्ध्याहून जास्त लोक इथे दुबईत राहतात. जर तुम्हाला कोणाच्या संपर्कात राहायचे असेल तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात राहता, यावर माझा विश्वास आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतो. पण, मला वाटते की माझी वेळ कधी आली नाही. आता मी आशा करते, प्रार्थना करते की ती वेळ ही आहे. बघूया, माझ्यापर्यंत कोण पोहोचते.”

दुबईला त्या का गेल्या, यावर बोलताना कल्पना अय्यर म्हणाल्या, “माझा एक मित्र दुबईला होता. मी त्याच्याबरोबर काम करण्यासाठी आले. वेळ निघून गेला. मी सुखी आयुष्य जगत होते. त्यामुळे माझे कुटुंबही आनंदी होते.”

दरम्यान, रंबा हो हो हो हे गाणे धुरंधरमध्येदेखील पाहायला मिळाले. त्यामुळे या गाण्याची पुन्हा एकदा चर्चा झाली.