बॉलीवू़ड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात पार पडला. वरुण धवनपासून ते शिल्पा शेट्टी, अक्षय कुमारपर्यंत बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं शीख आणि सिंधी या दोन्ही पद्धतीत लग्न झालं. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न या सगळ्या विधींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. लग्न झाल्यानंतर मुंबईत येताच या नवविवाहित जोडप्याने पापाराझींना मिठाई वाटली. आता रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी त्यांच्या कुटुंबासह अमृतसरला गेले आहेत.

लग्नगाठ बांधल्यानंतर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी हे नवविवाहित जोडपं आता अमृतसरला पोहोचलं आहे. १६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिलं आहे. येथील सुवर्ण मंदिर हे ‘अमृत तलावा’च्या काठी आहे.

अमृतसरमधील फोटो रकुल प्रीत सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये रकुल आणि जॅकी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ उभे आहेत. यात रकुलने पिवळ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस घातला आहे, तर जॅकीने लाल रंगाचा कुरता परिधान केला आहे. या फोटोला ‘ब्लेस्ड’ (blessed) असं कॅप्शन देत ‘इक ओंकार’ हे गाणं रकुलने या फोटोला जोडलं आहे. अमृतसरला या जोडप्याबरोबर रकुलचे आई- वडीलसुद्धा आले आहेत.

हेही वाचा… पूजा सावंतच्या लग्नात सुखदा खांडकेकरच्या नखांची चर्चा; अभिनेत्रीकडून फोटो शेअर; म्हणाली, “आज या…”

लग्न होण्याआधी रकुल आणि जॅकी सिद्धीविनायक मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. दोघांनीही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करत दोन्ही पद्धतीत लग्न केलं आहे. रकुल आणि जॅकीने त्यांच्या लग्नातील पोशाखासाठी तरुण तहिलियानी या डिझायनरची निवड केली होती.

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर आता दीपिका पदुकोणची जुनी मुलाखत होतेय व्हायरल; अभिनेत्री म्हणालेली, “मला भरपूर मुलं…”

दरम्यान, रकुल व जॅकीच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं तर दोघं एकाच बिल्डिंगमध्ये रहात होते आणि एकमेकांचे शेजारी होते. परंतु, तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं झालं नव्हतं. दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या दरम्यान झाली होती. तीन ते चार महिन्यांच्या मैत्रीनंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रकुल आणि जॅकीने एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.