Urmila Matondkar and Jackie Shroff: ऊर्मिला मातोंडकरच्या एक्स पतीने नुकतेच दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे अभिनेत्रीही चर्चेत आली आहे. मराठमोठ्या ऊर्मिलाने ‘कानून’, ‘बेदर्दी’, ‘आ गले लग जा’, ‘रंगीला’, ‘दिवाने’, ‘जुदाई’, अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाद्वारे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
एका मुलाखतीत अहमद खान यांनी रंगीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी रंगीला चित्रपटात डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केले. या चित्रपटातून त्यांना नृत्यदिग्दर्शक म्हणून यश मिळाले. रंगीला या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि ऊर्मिला मातोंडकर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.
“एका मुलीला कसे उचलायचे हे मी त्यांना…”
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान यांनी चित्रपटातील हे रामा गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. ते म्हणालेले, “जॅकी श्रॉफ हे कठोर दिसतात; पण ते तसे नाहीत, ते मृदू स्वभावाचे आहेत. आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये हे रामा गाण्याचे शूटिंग करीत होतो. त्या गाण्यात त्यांच्यात भांडण सुरू आहे, हे दाखवायचे होते. ते हावभाव दिसणे गरजेचे होते. जॅकी श्रॉफ यांनी ऊर्मिला मातोंडकरला उचलले आणि गोल फिरवले. ते त्यांनी इतक्या रागात केले की, ऊर्मिलाच्या हातावर जखम झाली. जॅकी श्रॉफ मला म्हणालेले की, तू टेन्शन नको घेऊस. मी सांभाळून घेईन. मी त्यावेळी खूप लहान होतो. एका मुलीला कसे उचलायचे हे मी त्यांना कसे सांगणार, हा मला प्रश्न पडला होता. १९ वर्षांचा मुलगा जॅकी श्रॉफला कसे काय सांगणार? मला अजूनही लक्षात आहे की, त्यांच्या हातात एक पाण्याचा स्प्रे होता. त्यांनी हातावर पाणी घेतले आणि केसांवर लावले. ते म्हणाले की, असे केल्याने ते रागीट दिसतील. ते मला म्हणाले की, तू घाबरू नकोस मी सांभाळून घेईन.”
अहमद खान पुढे असेही म्हणालेले, “मला ऊर्मिलाने एक-दोनदा सांगितले होते की, तो मला खूप जोरात ओढत आहे. पण, त्यानंतर तिला समजले की, ती त्या सीनची गरज आहे. मला कळत नव्हते की काय चालले आहे. मी फक्त सूचनांचे पालन करीत होतो. मला जे करायला सांगितले आहे, तेच मी करत होतो. प्रत्येक सीन संपल्यानंतर राम गोपाल वर्मा उठायचे आणि लहान मुलांप्रमाणे टाळ्या वाजवायचे. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला.”
पुढे ऊर्मिलाबद्दल अहमद खान म्हणालेले, “मी आणि ऊर्मिला एकाच इमारतीत राहायचो. रंगीला या चित्रपटानंतर ती अनेक वर्षे माझी शेजारी होती. आमच्यात खास बॉण्डिंग आहे. कारण- आम्ही दोघेही बालकलाकार म्हणून या इंडस्ट्रीत आलो. शेखर कपूर आणि राम गोपाल वर्मा आमच्या दोघांचेही मेन्टॉर आहेत. आज जेव्हा कधीही मी ऊर्मिलाचा विचार करतो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटते. कारण- आमच्या आठवणी तितक्या चांगल्या आहेत. आम्ही एकत्र यश पाहिले आहे. “
ऊर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून शेखर कपूर यांच्या मासूम या चित्रपटात काम केले होते. तर, अहमद खान हे बालकलाकार म्हणून मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये दिसले होते. त्यांनी १९९५ ला प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या चित्रपटात काम केले.
अहमद खान यांनी सुरुवातील कोरिओग्राफर म्हणून काम केले असले तरी त्यांनी नंतरच्या काळात काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.
