Ahmed Khan on Anil Kapoor and Nana Patekar: अनिस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. २००७ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार दिसले होते. अॅक्शन आणि कॉमेडी या दोन्हींचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.
या चित्रपटात मजनू आणि उदयभाई या पात्रांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. ही पात्रे अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांनी साकारली होती. आता लवकरच वेलकम टू द जंगल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये अनेक कलाकार दिसणार आहेत. मात्र, नाना पाटेकर आणि अनिल कपूर या सिनेमात दिसणार नाहीत. जेव्हा चित्रपटात कोण दिसणार आहे, हे समोर आले तेव्हा अनेकांनी त्याबद्दल प्रश्न विचारले होते.
आता दिग्दर्शक अहमद खाननेदेखील याबद्दल मत व्यक्त केले आहे. अहमद खानने नुकतीच स्क्रीन ‘स्पॉटलाईट’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने ‘वेलकम ३’मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर नसल्याबद्दल त्याचे मत व्यक्त केले.
“यात समस्या…”
अहमद खान म्हणाला, “यात समस्या काय आहे? मी बागी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते; पण ‘बागी ४’चे दुसरे कोणीतरी केले. मी ‘वेलकम ३’चे दिग्दर्शन करीत आहे. ज्या अनिस बज्मी यांनी वेलकम अँड वेलकम बॅक’चे दिग्दर्शन केले त्यांनी ‘भूल भुलैया २’ व ‘भूल भुलैया३’चे दिग्दर्शन केले. ‘भूल भुलैया’चा पहिला भाग प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता”, असे म्हणत ‘वेलकम टू जंगल’मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर नसणे ही फार मोठी गोष्ट नसल्याचे त्याने म्हटले आहे.
कलाकार आणि दिग्दर्शक यांचे बदल चित्रपटांच्या फ्रँचायजीमध्ये नावीन्य आणतात, असे मत व्यक्त करीत तो म्हणाला, “अक्षय ‘वेलकम’मध्ये होता, तर जॉन अब्राहम ‘वेलकम बॅक’मध्ये होता. अक्षय ‘भूल भुलैया’च्या पहिल्या भागामध्ये होता. त्यानंतर कार्तिक आर्यन भूल भुलैया २ व ३ मध्ये दिसला. सिद्धार्थ आनंदने ‘वॉर’ चित्रपट बनवला आणि अयान मुखर्जीने ‘वॉर २’ बनवला.
“तुम्ही फक्त एका मर्यादेपर्यंत काहीतरी ताणू शकता. प्रत्येक चित्रपटाला मर्यादा असतात; पण फ्रँचायजीला नाही. इतके खिलाडी चित्रपट आले होते; पण कोणत्याही खिलाडी चित्रपटाचा इतर खिलाडींशी काहीही संबंध नव्हता. त्याचप्रमाणे, वेलकममध्ये, जॉनने अक्षयची जागा घेतली त्यामुळे नवीन कथा समोर आली. आता अक्षय पुन्हा आला आहे.” अहमद खान म्हणाला.
वेलकम टू द जंगलमध्ये नवीन काय आहे, याबद्दल अहमद खान म्हणाला की पोशाखात बदल केले आहे. संकल्पनेत बदल आहे. आर्मी स्टाइलचे कपडे त्यांना दिले आहेत. आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही चित्रपटाचा आवाज कमी केला आणि फक्त सीन पाहिले तर तुम्हाला वाटेल की ते काही तरी गंभीरपणे बोलत आहेत. कारण, त्यांच्या हातात बंदुका आहेत. जर तुम्ही आवाज वाढवला तर तुम्हाला कळेल ते काहीतरी वेड्यासारखे बोलत आहेत.”
स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अनीस बझमी म्हणालेले, “मी अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय वेलकम चित्रपट बनवू शकलो नसतो. त्यांच्याशिवाय तो चित्रपट बनवणे अवघड होते.माझे त्यांच्याबरोबर वेगळे समीकरण आहे. जर मी हा चित्रपट बनवत असतो, तर मी कसेही मी त्यांना या चित्रपटाचे भाग बनवले असते”, असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, वेलकम टू द जंगल चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच, संजय दत्त, रवीना टंडन, अर्शद वारसी, दिशा पटानी, परेश रावल असे अनेक कलाकार दिसणार आहेत.
