Aishwarya Rai and Abhishek Bachchan celebrate 19 years of togetherness: अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. मागील दोन वर्षे त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. अभिषेक व ऐश्वर्या वेगळे राहत आहेत, त्यांनी ग्रे डिव्हॉर्स घेतलाय, फक्त मुलीसाठी ते एकत्र येतात, एकमेकांचे वाढदिवस व एकत्र कार्यक्रमांना जातं टाळतात, अशा बऱ्याच अफवा पसरल्या. पण आता लग्नाच्या १९ व्या वाढदिवशी ऐश्वर्या रायने केलेल्या खास पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

लग्नाच्या १९ व्या वाढदिवशी ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली. ऐश्वर्याने पती अभिषेक व लेक आराध्याबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. तिघांचेही हे सुंदर सेल्फी चाहत्यांची मनं जिंकत आहेत. एका फोटोत तर एक सुंदर व मोठा पुष्पगुच्छदेखील दिसतोय. ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी लिहून हे फोटो पोस्ट केले आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काजोल, नीना गुप्तासह अनेकांनी या फोटोंवर कमेंट्स करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायची लव्ह स्टोरी

अभिषेक आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट १९९७ मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांनी ‘धाई अक्षर प्रेम के’ (२०००) आणि ‘कुछ ना कहो’ (२००३) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, पण तेव्हा ते केवळ चांगले मित्र होते. त्यांच्या प्रेमाची खरी सुरुवात ‘उमराव जान’ (२००६) आणि ‘गुरु’ (२००७) या चित्रपटांच्या दरम्यान झाली. ‘गुरु’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ते एकमेकांच्या जवळ आले.

अभिषेकने ऐश्वर्याला अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं होतं. ‘गुरु’ चित्रपटाचा न्यूयॉर्कमध्ये प्रीमियर झाल्यानंतर, हॉटेलच्या बाल्कनीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. विशेष म्हणजे, प्रपोज करताना त्याने कोणतीही महागडी हिऱ्याची अंगठी न वापरता चित्रपटात वापरलेली एक ‘नकली अंगठी’ वापरली होती. ऐश्वर्याने त्याला लगेच होकार दिला.

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचं लग्न

२० एप्रिल २००७ रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले. हे लग्न अत्यंत खासगी ठेवण्यात आले होते. फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर, १६ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना आराध्या नावाची मुलगी झाली. ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर एकमेकांबद्दल आदर व्यक्त करताना दिसतात. जरी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा अधूनमधून चर्चेत येत असल्या, तरी या जोडीने नेहमीच एकमेकांना खंबीर साथ दिली आहे आणि आजही ते बॉलीवूडचे एक ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जातात.