ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी या एकेकाळी बॉलीवूडमधील जवळच्या मैत्रिणी मानल्या जात होत्या. इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या काळात दोघीही एकमेकींबद्दल नेहमीच कौतुकाने बोलायच्या. मात्र, शाहरुख खानच्या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलते चलते’ चित्रपटाशी संबंधित वादानंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर अनेक वर्षे दोघींच्या नात्याबद्दल विविध चर्चा आणि तर्क-वितर्क लावण्यात आले. या सगळ्या प्रकरणात अभिषेक बच्चनचं नावही जोडलं गेलं. दोघींमध्ये इतके वाद होते की ऐश्वर्याने राणी मुखर्जीला तिच्या लग्नातही बोलावलं नव्हतं. असं म्हटलं जातं. एखदा राणीने याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.
ऐश्वर्या राय सुरुवातीला शाहरुख खानच्या ‘चलते चलते’ चित्रपटाचा भाग होती. मात्र, नंतर तिला या चित्रपटातून वगळण्यात आलं आणि तिच्या जागी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली. मंनी कंट्रोलच्या वृत्तांनुसार, त्यावेळी राणीला जवळची मैत्रीण मानणाऱ्या ऐश्वर्याला ही गोष्ट आवडली नाही, कारण तिच्या जागी राणीने चित्रपट स्वीकारला होती. त्या वेळी दोघींनीही त्यांच्यात नेमकं काय घडलं, याबद्दल सार्वजनिकपणे सविस्तर भाष्य केलं नाही. मात्र, नंतर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात राणीने त्यांच्या बदललेल्या नात्याबद्दल भाष्य केलं.
तिने माझ्याशी फोनवर बोलणं बंद केलं – ऐश्वर्याबद्दल राणीची प्रतिक्रिया
करण जोहरने ऐश्वर्या रायबरोबरच्या वादाबद्दल राणीला विचारलं असता, राणीने “आणि त्यामागची कारणं तुला माहीत आहेत” असं मिश्कीलपणे उत्तर दिलं. पुढे बोलताना राणीने स्पष्ट केलं की, ऐश्वर्याबरोबर तिचा वैयक्तिक कोणताही वाद नव्हता. ती म्हणाली, “कदाचित ऐश्वर्याला माझ्याबद्दल काहीतरी खटकत असेल, कारण तिने माझ्याशी फोनवर बोलणं बंद केलं”. पण कधी कुठल्या कार्यक्रमात भेट झाली तर त्या नक्की एकमेकींशी संवाद साधतील असंही तिने स्पष्ट केलं होतं.
ऐश्वर्या-अभिषेक यांच्या लग्नाचं राणीला निमंत्रण नव्हतं
२००७ मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर लग्न केलं. मात्र, या लग्नासाठी राणी मुखर्जीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे दोघींच्या नात्यातील दुराव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. राणी आणि अभिषेक यांनी ‘बंटी और बबली’, ‘युवा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे त्यावेळी दोघे डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.
अभिषेक व ऐश्वर्या यांच्या लग्नाचं निमंत्रण न मिळाल्याबद्दल राणीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “यामागचं कारण केवळ अभिषेकच सांगू शकतो. एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या लग्नाचं निमंत्रण देत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं स्थान नेमकं कुठे आहे, याची जाणीव होते” असंही तिने म्हटलं होतं. या प्रसंगामुळे तिच्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दलही तिला एक गोष्ट स्पष्ट झाली. ते फक्त सहकलाकार होते, मित्र नव्हते, असं राणीने सांगितलं. मात्र, लग्नासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं आणि कोणाला नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचंही तिने मान्य केलं.
