ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि नीता अंबानी यांनी एकत्र सलमान खानच्या गाण्यावर डान्स केला, असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरं आहे. सोशल मीडियावर या तिघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे तिघेही मंचावर भाईजानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

या डान्सचं निमित्त ठरलं मुदित अदानी आणि अनन्या दिवानजी यांचं लग्न. नीता अंबानींनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबरोबर स्टेजवर एक सुंदर डान्स केला. हे पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नीता अंबानी यांनी ऐश्वर्या, अभिषेक व इतरांबरोबर ज्या पद्धतीने ठेका धरला, ते पाहून तर नेटकरीही अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तिघेही इतर काही जणांबरोबर ‘सलाम-ए-इश्क’ या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसतात. शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं समीर यांनी लिहिलं आहे. या चित्रपटात सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, जुही चावला, गोविंदा आणि शॅनन एसरा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

ऐश्वर्या राय उत्तम डान्सर आहे. अभिषेक बच्चन देखील खूप चांगला डान्स करतो. नीता अंबानी यांनी त्या दोघांच्या तोडीस तोड डान्स केल्यामुळे सर्वजण थक्क झाले आणि हा डान्स या कार्यक्रमातील चर्चेचा विषय ठरला. ऐश्वर्याने गडद निळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातला होता. तर अभिषेकने गडद निळ्या रंगाची शेरवानी घालून ट्विनिंग केलं होतं. दुसरीकडे, नीता यांनी पन्ना-ग्रीन रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

सोशल मीडिया सेलिब्रिटी ओरहान अवत्रामणी उर्फ ओरी देखील या सोहळ्याला उपस्थित होता. त्याने इन्स्टाग्रामवर या लग्नातील काही खास व्हिडीओ शेअर केले आहेत. ओरीने इन्स्टाग्राम स्टोरीजवर ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या यांच्याबरोबरचे सेल्फी पोस्ट केले. त्याचबरोबर त्याने नवविवाहित जोडपे मुदित अदानी आणि अनन्या दिवानजी यांच्याबरोबरचे फोटोही शेअर केले.

या लग्न सोहळ्याला आमिर खान, त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, अभिनेत्री अनन्या पांडे, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, आर्ट कलेक्टर शालिनी पासी यांच्यासह इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

कोण आहेत मुदित अदानी-अनन्या दिवानजी?

मुदित अदानी हे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचे पुतणे आहेत. ते गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचे चिरंजीव आहेत. ते अदानी समूहातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. मुदित अदानी यांचे लग्न अनन्या दिवानजी यांच्याशी झाले आहे. अनन्या या प्रख्यात वकील अमित दिवानजी यांच्या कन्या आहेत.