आज ऐश्वर्या राय बच्चन तिचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्याबद्दलचे काही किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी एकदा लग्न, कुटुंब आणि घटस्फोटाबद्दलची त्यांची मतं यावर दोघांनीही भाष्य केलं होतं. २००७ मध्ये लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी हे सांगितलं होतं.
ऐश्वर्याने अमेरिकेत अभिषेकला लग्नासाठी विचारलेलं
ऐश्वर्या व अभिषेक यांनी २००९मध्ये ओप्रा शोमध्ये याबद्दल संवाद साधला होता.या मुलाखतीत अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला लग्नासाठी कसं विचारलं, यामागचा खास किस्साही सांगितला होता. न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तो अनेकदा हॉटेलच्या खोलीतील बाल्कनीत उभा राहून ऐश्वर्या आपल्यासोबत असती तर किती छान झालं असतं, असा विचार करायचा. काही काळानंतर त्याने ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत नेलं आणि तिथे ऐश्वर्यानेच त्यांना लग्नासाठी विचारलं. अशी आठवण त्याने सांगितली होती.अभिषेक म्हणाला होता, “मी न्यूयॉर्कमध्ये शूटिंग करत होतो. हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभं राहून ती माझ्यासोबत असती तर किती छान झालं असतं, असा विचार करायचो. काही काळानंतर मी तिला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिनेच मला लग्नासाठी विचारलं.”
घटस्फोटाबद्दल ऐश्वर्या काय म्हणालेली?
ओप्रा विन्फ्रे यांना यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या शाही लग्नसोहळ्याची झलकही दाखवण्यात आली होती. याबद्दल बोलताना अभिषेकने भारतीय लग्नसोहळे अनेक दिवस चालतात, कारण प्रत्येक प्रसंगाचा आनंद साजरा करण्याची आपली परंपरा आहे, असं सांगितलं. त्यावर ओप्रा यांनी मजेशीर टिप्पणी करत इतका मोठा लग्नसोहळा झाल्यानंतर घटस्फोट घेणंही कठीण जात असेल, असं म्हटलं. यावर ऐश्वर्याने लगेचच उत्तर दिलं होतं. ती म्हणाली होती, “आम्ही असा विचार करण्याचाही प्रयत्न करत नाही.” अशा शब्दांत तिने घटस्फोटाचा विचारही आपल्या मनात नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
ओप्रा यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नानंतर अभिषेकच्या आई-वडिलांबरोबर राहतात का आणि त्यांचं एकत्र कसं जमतं, असं विचारलं. यावर अभिषेकने ओप्रा यांनाच तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर राहत नाही तुम्हाला कसं जमतं, असा प्रतिप्रश्न केला.
