Aishwarya Rai & Abhishek Bachchan Dance Video : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी १२ डिसेंबर २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकली. ईशा आणि आनंद पिरामलच्या लग्नाचं प्री-वेडिंग राजस्थान येथील उदयपूरमध्ये पार पडलं होतं. ईशा-आनंदच्या प्री-वेडिंग सोहळ्याला संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन सुद्धा या प्री-वेडिंगला उपस्थित होते. सगळ्या कलाकारांनी मिळून ईशाच्या लग्नात खास परफॉर्मन्स सुद्धा सादर केले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात ‘तेरे बिना…’ गाण्यावर सुंदर रोमँटिक डान्स केला होता. “तेरे बिना चांद का सोना खोटा रे…पीली पीली धुल उडावे झूटा रे” या कडव्यावर ऐश्वर्याने पती अभिषेकसह ठेका धरल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटातील मूळ गाण्यात सुद्धा ऐश्वर्या-अभिषेकच झळकले आहेत. त्यांच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुरू’ चित्रपटात ‘तेरे बिना’ हे गाणं होतं. आज इतक्या वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ कायम आहे.
ऐश्वर्याने ईशा अंबानीच्या लग्नात मूळ गाण्याप्रमाणे हुबेहूब हूकस्टेप करत तिचा परफॉर्मन्स सादर केला होता. या ७ वर्षांपूर्वीच्या ( २०१८ ) व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या-अभिषेकची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने सुंदर डिझायनर लेहेंगा घातल्याचं पाहायला मिळतंय, तर अभिषेकरने लाल रंगाची शेरवानी घातली होती.
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “या दोघांची केमिस्ट्री कमाल आहे…लोक उगाच Hate क्रिएट करतात”, “ऐश्वर्याला तिच्या मूळ गाण्यातील हूकस्टेप्स अजूनही लक्षात आहेत”, “मस्त डान्स, खरंच दोघांची केमिस्ट्री कमाल आहे आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे”, “ऐश्वर्याचा डान्स…तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, “सुंदर जोडी…मस्त डान्स” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या राय बच्चन JW Marriott ची पहिली ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आपला प्रवास सुरू करतेय. तर अभिषेक बच्चन नुकताच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकला.
