बॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री कधीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत असं बोललं जायचं. पण, ऐश्वर्या राय व राणी मुखर्जीने हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. या दोघींची मैत्री खूपच घट्ट आणि अनेकांसाठी आदर्श अशी होती. पण, असं काय घडलं, ज्यामुळे एका क्षणात यांची मैत्री तुटली याबाबत आज आपण जाणून घेऊयात…
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. यामध्ये ती राणी मुखर्जीबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगत होती. ऐश्वर्या आणि राणी एका आंतरराष्ट्रीय कॉन्सर्ट टूरदरम्यान जवळपास ४५ दिवस एकत्र होत्या. त्या एकत्र राहिल्या, एकत्र ट्रॅव्हल केलं, त्यांचे कुटुंबीय सुद्धा या काळात एकमेकांना भेटले होते… त्यामुळे या सगळ्यांमध्ये खूप छान मैत्री झाली होती. पण, पुढे असं काही घडलं ज्यामुळे यांची मैत्री तुटली…
२००३ मध्ये शाहरुख खानचा ‘चलते चलते’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये शाहरुख-राणीची जोडी सर्वांना पाहायला मिळाली. पण, सुरुवातीला ही भूमिका ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आली होती. शाहरुख-ऐश्वर्याने ‘चलते चलते’साठी शूटिंगही सुरू केलं होतं. पण, याचदरम्यान ऐश्वर्याचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं होतं. सलमान-ऐश्वर्याचं अफेअर आणि त्यांच्यात होत असलेले वाद या गोष्टी तुफान चर्चेत आल्या होत्या.
‘चलते चलते’च्या सेटवर सलमानने येऊन अनेकदा शूटिंगमध्ये अडथळा निर्माण केल्याचं देखील बोललं जातं. यामुळे ऐश्वर्याला या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ऐश्वर्याच्या हातून ‘चलते चलते’सारखा चांगला सिनेमा निसटला. यानंतर ही भूमिका राणीला ऑफर केली गेली. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला राणी ही भूमिका करण्यास फारशी उत्सुक नव्हती. कारण, काही महिने आधीच तिने ‘साथिया’ सिनेमात काम केलं होतं. तिला दोन्ही सारख्याच भूमिका करायच्या नव्हत्या.
काजोल, अमीषा पटेल यांची नावंही ‘चलते चलते’साठी चर्चेत आली होती. पण, कालांतराने राणीने सिनेमासाठी होकार दिला आणि शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला मिळाली. राणी आणि ऐश्वर्या राय दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पण, राणीने ही भूमिका स्वीकारल्यामुळे या दोघींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला.
‘चलते चलते’ सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या सिनेमातील गाणी आजही सर्वत्र सुपरहिट आहेत. पण, या सिनेमामुळे ऐश्वर्या-राणीमध्ये कायमचा दुरावा आला. या दोघींनीही यावर कधीही जाहीरपणे प्रतिक्रिया दिली नाही. पण, या घटनेनंतर ऐश्वर्या-राणी फारशा एकत्रही दिसल्या नाहीत.
