बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ऐश्वर्या रायने आई झाल्यानंतर मोजकेच चित्रपट केले आहेत. त्यापैकी बहुतांशी चित्रपट हिट ठरले. ऐश्वर्या तिची लेक आराध्याबरोबर वेळ घालवते, तिचं संगोपन करण्यात व्यग्र असते. ऐश्वर्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावते. विविध विषयांवर तिची मतं मांडत असते. एकदा तिने विवाहित महिलांना सल्ला दिला होता. शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे, असं विधान तिने केलं होतं.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी २००७ मध्ये करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा केली होती. अभिषेकने म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा त्याचं व ऐश्वर्याचं भांडण होतं तेव्हा तोच आधी बोलतो. कोणताही विवाहित पुरुष माझी परिस्थिती समजू शकतो. कोणतीही पत्नी कधीच आधी माफी मागत नाही. तो हसला आणि म्हणाला, “प्रत्येक लग्नात, पत्नी नेहमीच बरोबर असते.”
ऐश्वर्या रायने काय म्हटलं होतं?
अभिषेकच्या वक्तव्यानंतर, ऐश्वर्याने असं उत्तर दिलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. “शांत राहणं ही विवाहित महिलेची सर्वात मोठी ताकद आहे,” असं ती म्हणाली. “मी हट्टीपणा करण्याबद्दल बोलत नाहीये, तर शांत राहणं प्रेम टिकवून ठेवण्याबद्दल बोलतेय,” असं ऐश्वर्याने स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. दोघेही सुखाने संसार करत आहेत. पण अनेकदा ऐश्वर्या व अभिषेकच्या घटस्फोटाबद्दल अफवा पसरत असतात. पण ते दोघेही घटस्फोटांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं टाळतात. अलीकडे तर ऐश्वर्या व अभिषेक अनेकदा एकत्र दिसतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी परदेशात गेले होते. अभिषेक व ऐश्वर्याचा लेक आराध्याबरोबरचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास ऐश्वर्या राय शेवटची PS2 सिनेमामध्ये दिसली होती. तेव्हापासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही किंवा तिने कोणत्याही नवीन चित्रपटाची अद्याप घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, अभिषेक बच्चन शाहरुख खानच्या ‘किंग’मध्ये नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे.
