Aishwarya Rai at Cannes 2026 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बहुप्रतीक्षित बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सामील झाली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या कधी झळकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. ब्लू रंगाच्या स्टायलिश आणि एलिगंट गाऊनमध्ये ऐश्वर्याने रेड कार्पेटवर दिमाखदार एन्ट्री घेतली. तिच्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावरही ऐश्वर्याच्या या ग्लॅमरस अंदाजाची जोरदार चर्चा रंगली आहे.

दोन दशकांपासून अधिक काळ ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. ऐश्वर्याचा रेड कार्पेटवरील आत्मविश्वास, मनमोहक हास्य आणि ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐश्वर्याचा मोठा चाहता वर्ग आहे, यामुळे या वर्षी कान्स फेस्टिव्हलमधील तिची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. अखेर कान्समध्ये ऐश्वर्या सामील झाली असून तिने दोन लूक केले. मुलगी आराध्यसह ऐश्वर्या राय शुक्रवारी कान्समध्ये सहभागी झाली आहे.

रॉयल ब्लू गाऊनमध्ये स्टाईलिश लूक

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने निळ्या रंगाचा स्टाईलिश आणि स्ट्रक्चर गाऊन स्टाईल केला होता. तिच्या गाऊनवर करण्यात आलेल्या नाजूक सिक्विन वर्कमुळे लूक अधिक आकर्षक दिसत होता. डीप नेकलाइनसह स्लीव्ह्जवर केलेले बारकाईने केलेले डिझाइन संपूर्ण लूकला एलिगंट टच देत होते. लाँग ट्रेल असलेल्या या गाऊनसोबत ऐश्वर्याने ग्लॉसी शिफॉनची फ्लोई ट्रेल स्टाईल केली होती, ज्यामुळे तिचा रेड कार्पेट लूक अधिकच रॉयल दिसत होता. यासह सॉफ्ट वेवी मोकळे केस ऐश्वर्याचा लूक स्टाईलिश करत होते. यावेळी तिने फक्त गळ्यामध्ये पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा डायमंड ज्वेलरी पीस स्टाईल केला होता.

भारतीय पद्धतीने सर्वांना नमस्कार

अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला हा गाऊन फॅशनेबल आणि मॉडर्न लूक देणारा होता. ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमी रेड कार्पेटवर आत्मविश्वासाने पोझ देताना दिसून येते. तिचा आत्मविश्वास आणि ग्लॅरमस अंदाज तिचे वेगळेपण दाखवून देतो. विशेष म्हणजे, ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमी रेड कार्पेटवर भारतीय पद्धतीने नमस्कार करताना दिसून येते. दरवेळीप्रमाणे यंदाही भारतीय संस्कृतीची झलक दाखवत हात जोडून सर्वांना नमस्कार करताना दिसली. त्यासोबतच तिने चाहत्यांकडे हार्ट जेस्चर करत फ्लाइंग किस देत सर्वांचे अभिवादन केले.

दोन दशके गाजवले ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’

२००२ साली ऐश्वर्या राय पहिल्यांदा रेड कार्पेटवर दिसून आली होती. तिच्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या आणि शाहरुख एकत्र रेड कार्पेटवर दिसून आले होते. यानंतर २००३ पासून ऐश्वर्या राय कान्समध्ये L’Oréal पॅरिस या ब्रॅण्डची ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकत आहे. तिचे लूक आणि तिची स्टाईल ही दरवर्षी चर्चेचा विषय ठरते. ऐश्वर्याचा कान्स लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.यंदा मात्र पहिल्याच दिवशी आलिया भट्टने कान्समध्ये सहभाग घेतल्यामुळे ऐश्वर्या नेमकी कधी रेड कार्पेटवर दिसणार, याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. अखेर ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या रॉयल आणि ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर एन्ट्री करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.