Aishwarya Rai Bachchan JW Marriott Ambassador: बॉलीवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील सहभागामुळे सर्वत्र चर्चेत होती. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या कान्सचं रेड कार्पेट गाजवतेय, ती L’Oréal Paris ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून ओळखली जाते. यंदा तिचं कान्स सोहळ्याचं २४ वं वर्ष होतं. ऐश्वर्याचे रेड कार्पेटवरील जबरदस्त लूक अन् फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते. मात्र, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर कान्सचे फोटो किंवा व्हिडीओ अद्याप शेअर केलेले नाहीत.
ऐश्वर्या कान्स सोहळ्यासंदर्भातील अधिकृत पोस्ट केव्हा शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, यादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या लाखो चाहत्यांना एक वेगळीच आनंदाची बातमी दिली आहे. ऐश्वर्या राय बच्चन JW Marriott ची पहिली ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आपला प्रवास सुरू करतेय. अभिनेत्रीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
ऐश्वर्या राय बच्चन JW Marriott ब्रँडच्या ‘स्टे इन द मोमेंट’ (Stay in the Moment) या प्लॅटफॉर्मचा एक महत्त्वाचा भाग झाली आहे. यापुढे, ती या ब्रँडचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी प्रतिनिधित्व करेल. JW Marriott हा ब्रँड जगभरात १३० हून अधिक हॉटेल्स चालवतो.
ऐश्वर्या याबाबत म्हणते, “जे क्षण आपण खऱ्या अर्थाने अनुभवतो…तेच क्षण कायम आपल्याबरोबर राहतात आणि तेच आपण कायम जपतो असा माझा ठाम विश्वास आहे. JW Marriott स्टे इन द मोमेंट”. ऐश्वर्याने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे JW Marriott ब्रँडची ऐश्वर्या पहिली ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर असल्यामुळे तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीचा प्रचंड अभिमान वाटतोय.
“ऐश्वर्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, “एव्हरग्रीन ब्युटी”, “कमाल लूक”, “ऐश्वर्या मॅम आता कान्सचे सुद्धा फोटो शेअर करा प्लीज”, “वॉव अजूनही विश्वास बसत नाहीये”, “सर्वात सुंदर अभिनेत्री” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या कान्सच्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित राहिली होती. यावेळी तिच्याबरोबर लेक आराध्या बच्चन सुद्धा होती. यंदा कान्स सुरू होण्यापूर्वी ‘ले मार्टिनेझ’ हॉटेल बाहेरील भव्य पोस्टरवरून ऐश्वर्याला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. याशिवाय ऐश्वर्याच्या कान्समधील उपस्थितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण, शेवटच्या दिवशी कान्सला उपस्थित राहून तिने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
