Cannes 2026 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. यंदाचा ७९ वा कान्स सोहळा १२ मे-२३ मे यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात काही वर्षांपूर्वी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर तारिणी पेशावरिया देखील सहभागी झाली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या तारिणीने तिचा कान्समधील अनुभव सर्वांना सांगितला आहे. याशिवाय ऐश्वर्या राय कान्सच्या रेड कार्पेटवर येताच सगळे तिला कशाप्रकारे अभिवादन करतात याचा अनुभवही या इन्फ्लुएन्सरने सांगितला आहे.
तारिणी पेशावरियाने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तिच्या चार वर्षांपूर्वीच्या पहिल्या कान्स फेस्टिव्हलच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणते, “मी ४ वर्षांपूर्वी कान्सला गेले होते…आज मी तुम्हाला या महोत्सवाबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या कोणालाच माहिती नाहीयेत. रेड कार्पेटचा क्षण हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्यक्षात तुम्हाला रेड कार्पेटवर पोझ देण्यासाठी फक्त १-२ मिनिटांचा कालावधी मिळतो. पण, ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा रेड कार्पेटवर येते तेव्हा असं होतं नाही…तिच्यासाठी संपूर्ण रेड कार्पेट ओपन केलं जातं. ऐश्वर्याच्या मागे आम्ही काही इन्फ्लुएन्सर होतो…तिने जशी एन्ट्री घेतली त्यानंतर १० मिनिटं कोणीही रेड कार्पेटवर प्रवेश करायचा नाही असं सांगण्यात आलं होतं, कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी दिली नव्हती.”
तारिणी पेशावरिया पुढे सांगते, “अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवरचे फोटो कॅप्चर करण्यासाठी स्वत:चा फोटोग्राफर नियुक्त करतात. कारण, तिथे मीडियामध्ये उभा असलेला प्रत्येक फोटोग्राफर तुमचे फोटो काढेलच असं नाहीये. कारण, ते लोक तुम्हाला ओळखत नसतात. मी ७ व्हिडीओ आणि ७ फोटो काढण्यासाठी ४४ हजार ५०० रुपये दिले होते. सुदैवाने ही माझी स्पॉन्सर ट्रिप होती, नाहीतर इतका खर्च मला परवडला नसता.”
याशिवाय मनीष मल्होत्राकडून मिळालेल्या मदतीविषयी तारिणी सांगते, “कान्स सोहळ्यादरम्यान एकदा मला माझी साडी नीट नेसता येत नव्हती. तेव्हा मनीष मल्होत्रा यांनी त्यांच्या टीममधील एका व्यक्तीला माझी साडी नेसण्यास मदत करण्यासाठी पाठवलं होतं…हे किती छान आहे.”
दरम्यान, सध्या कान्स सोहळ्याचं ७९ वं एडिशन सुरू असून २३ मे रोजी या कार्यक्रमाची सांगता होईल. यावर्षी आलिया भट्ट, तारा सुतारिया, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी, कल्याणी प्रियदर्शन यांसारखे सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. तर कान्सची क्वीन ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित राहणार आहे.
