Aishwarya Rai Bachchan shares post for Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबर २०२६ ला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला फक्त चाहत्यांनीच नाही तर कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. अमिताभ बच्चनही त्यांच्या चाहत्यांना भेटल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ऐश्वर्या रायची सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास पोस्ट

आता या सगळ्यात ऐश्वर्या रायने अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आराध्या व अमिताभ बच्चन यांचा एक अनसीन फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रिय पा-दादाजी. तुमच्यावर नेहमीच प्रेम राहील. देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो.” या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी ट्रॅकसूट आणि डोक्यावर टोपी घातल्याचं पाहायला मिळत आहे, तर आराध्याने केसांवर हेअरबँड लावला असल्याचे दिसत आहे. आराध्या या लूकमध्ये गोड दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर अनेकांनी अमिताभ बच्चन ऐश्वर्याला कधीच शुभेच्छा देत नाहीत; ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देते पण जया यांना देत नाही, अशाही कमेंट्स केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. यावेळी अनेक चाहत्यांच्या हातात अमिताभ बच्चन यांचे फोटो असलेले पोस्टर्स पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते चिरंजीवी, अजय देवगण आणि संजय दत्त यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.