Aishwarya Rai Called Rekha Maa: बॉलीवूडचे शेकडो किस्से आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात, त्यापैकी एक म्हणजे सदाबहार अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं. अमिताभ बच्चन यांच्याशी असलेल्या एकेकाळच्या नात्याबद्दल आजही बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आता रेखा आणि बिग बी एकमेकांसमोर येणे टाळत असले, तरी बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिच्याशी रेखा यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या रायने हजारो लोकांसमोर रेखा यांना थेट ‘मां’ अशी हाक मारली होती, ज्याचा व्हिडीओ आजही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. ऐश्वर्याने रेखा यांना दिलेल्या या आदरामुळे रेखा देखील भावुक झाल्या होत्या.
खरं तर जया बच्चन यांच्याशीही रेखा यांचे चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये रेखा जया बच्चन यांना प्रेमाने भेटताना दिसतात. रेखा यांनी करिअरची सुरुवात केली तेव्हापासून त्या दोघांमध्ये मैत्री आहे. रेखा जेव्हाही अभिषेक, त्याची पत्नी ऐश्वर्या व त्यांची लेक आराध्या यांना भेटतात, तेव्हा त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतात. रेखा आणि ऐश्वर्या जेव्हा जेव्हा एकमेकीना भेटतात तेव्हा त्यांच्यातील बॉन्ड स्पष्टपणे दिसून येतो. ऐश्वर्याने एकदा तर रेखा यांना आई म्हटलं होतं.
ऐश्वर्या राय देखील रेखा यांच्याप्रमाणेच दक्षिण भारतीय आहे. दक्षिणेत स्वत:हून मोठ्या महिलांना आई (मां) म्हणून हाक मारतात. ऐश्वर्याही तिच्या संस्कृतीचं पालन करते. एकदा स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये रेखा यांना ऐश्वर्याने हजारो लोकांसमोर ‘मां’ म्हटलं होतं. ऐश्वर्याच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ऐश्वर्या रायला तिच्या ‘जज्बा’ चित्रपटासाठी स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये पुरस्कार देण्यात आला होता. ऐश्वर्याला रेखा यांनी हा पुरस्कार प्रदान केला होता. पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याने रेखा यांचे आभार मानले आणि म्हणाली, “आईकडून हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला.” तिचं बोलणं ऐकून रेखा म्हणाल्या, “मला आशा आहे की मी तुला आणखी अनेक वर्षे हा पुरस्कार प्रदान करू शकेन.”
पाहा रेखा व ऐश्वर्या राय यांचा व्हिडीओ
रेखा यांनी लिहिलं होतं ऐश्वर्या रायसाठी पत्र
ऐश्वर्या रायने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली तेव्हा रेखा यांनी तिच्यासाठी एक भावनिक पत्र लिहिलं होतं. हे पत्र फेमिना २०१८ मध्ये दाखवण्यात आलं होतं. पत्रात रेखा यांनी ऐश्वर्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. ऐश्वर्याने तिच्या आयुष्यातील संघर्षांना किती हिमतीने तोंड दिलं आणि एक महत्त्वाचं स्थान मिळवलं, त्याचा उल्लेखही रेखा यांनी केला होता. त्या पत्रात रेखा यांनी स्वतःला ‘रेखा मां’ असं संबोधलं होतं.
२०१७ मध्ये, फिल्मफेअर ग्लॅमर आणि स्टाईल अवॉर्ड्समध्ये रेखा यांनी ऐश्वर्याला स्वतःच्या हातांनी हा पुरस्कार दिला होता. त्यानंतर ऐश्वर्याच्या सौंदर्याचे कौतुक करताना रेखा म्हणाल्या होत्या की, ऐश्वर्याची आई जेव्हा गरोदर होती तेव्हा ती माझे फोटो पाहत राहायची आणि त्यामुळे ऐश्वर्या इतकी सुंदर दिसते.
