Aishwarya Rai poses with family: ऐश्वर्या राय सध्या बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात काम करीत नसली तरी ती विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. अभिनेत्री आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. तिचा लूक, ती ज्या पद्धतीने कॅमेऱ्याच्या समोर जाते, तसेच तिचा आत्मविश्वास आणि तिचे सौंदर्य यांबाबत कायमच चर्चा होताना दिसते.
या सगळ्याबरोबरच ऐश्वर्या राय तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते. ऐश्वर्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय नसली तरीही ती काही खास क्षणांचे व्हिडीओ, फोटो ती सोशल मीडियावर शेअर करीत असते.
आता नुकताच रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे ऐश्वर्याने नाही, तर तिचा भाऊ आदित्यने सोशल मीडियावर
काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये ऐश्वर्या व तिच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या रायच्या माहेरच्या कुटुंबाला पाहिलंत का?
आदित्यने ३१ ऑगस्टला काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये ऐश्वर्याचीही झलक दिसत आहे. तिने भाऊ आदित्य व वहिनी आणि त्यांची मुले शिवांश व विहानबरोबर फोटो काढले आहेत. याबरोबरच ऐश्वर्याची आई वृंदा राय आणि आराध्याही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. वृंदा राय यांनी नातवंडांबरोबर फोटो काढल्याचे दिसत आहे. संपूर्ण कुटुंबाच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना आदित्यने ‘रक्षाबंधन २०२६’, अशी कॅप्शन दिली.
ऐश्वर्याने रक्षाबंधनसाठी साधा लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. तसेच केस मोकळे असून, डोक्यावर गॉगल दिसत आहे; तर आदित्य व आराध्यानेही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर आदित्यची पत्नी श्रीमाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक चाहते, नेटकरी फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करीत आहेत. एकाने लिहिले, “हा फोटो खूप आवडला. आजी क्यूट आहे आणि तिची नातंवडंदेखील गोड आहेत.” एकाने लिहिले, “या कुटुंबावर कायम देवाचा आशीर्वाद असू दे.” आणखी एकाने लिहिले, “सुंदर.” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.
कोण आहे आदित्य राय?
ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहतो. काही रिपोर्ट्सनुसार तो मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनीयर म्हणून काम करतो. तो खूप कमी वेळा मीडियासमोर येतो. आदित्यने २००३ मध्ये ‘दिल का रिश्ता’ या सिनेमाची सहनिर्मिती केली होती. त्यामध्ये ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत दिसली होती. वृंदा राय यांनी या सिनेमाचे सहलेखन केले होते.
ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती २०२३ मध्ये मणि रत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन २’मध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. आता ती आगामी काळात कोणत्या सिनेमात दिसणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
