Aishwarya Rai At Cannes 2026 : गेल्या काही दिवसांपासून जगभरातील चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची सुरुवात १२ मे रोजी झाली, तेव्हापासून ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी २२ मे रोजी पार पडणाऱ्या क्लोझिंग सेरेमनीला ऐश्वर्या उपस्थित राहील असं वृत्त समोर आलं होतं. तसेच याबाबत सोशल मीडियावर सुद्धा चर्चा रंगल्या होत्या. आता या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा ऐश्वर्या राय आपल्या लेकीसह एअरपोर्टवर दिसली आणि तेव्हाच ती कान्ससाठी रवाना होत असल्याचं स्पष्ट झालं. आता ऐश्वर्याचा कान्सच्या हॉटेलबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतीच ती कान्सच्या हॉटेल मार्टिनेझमध्ये दाखल झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या कान्सचं रेड कार्पेट गाजवतेय, ती L’Oréal Paris ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून ओळखली जाते. मात्र, यंदा ‘ले मार्टिनेझ’ हॉटेल बाहेरील भव्य पोस्टरवरून ऐश्वर्याला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. याशिवाय ऐश्वर्याच्या कान्समधील उपस्थितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. सोशल मीडियावर सर्वत्र ऐश्वर्या कान्सला जाणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती.
अखेर ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकी कान्सला रवाना झाल्यावर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता त्याच ‘ले मार्टिनेझ’ हॉटेलमध्ये ऐश्वर्या लेकीसह पोहोचली आहे. ऐश्वर्याचं याठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. तिला फुलांचा सुंदर गुच्छ देण्यात आला, यानंतर ऐश्वर्याने फोटोसाठी पोझ सुद्धा दिली. या मायलेकी ‘ऑल इन ब्लॅक’ लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
ऐश्वर्याला पाहताच तिथे उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला. गर्दीतून एक चाहती म्हणाली, “लव्ह यू ऐश्वर्या…” यावर ऐश्वर्याने “थँक्यू सो मच…लव्ह यू टू!” असा रिप्लाय देत आपल्या सर्व चाहत्यांना फ्लाइंग किस सुद्धा दिलं.
दरम्यान, ऐश्वर्या कान्सच्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित राहणार आहे. यावर्षी ती रेड कार्पेटवर कसा लूक करणार याकडे तिच्या लाखो चाहत्यांचं लक्ष असेल. गेल्यावर्षी ऐश्वर्याने रेड कार्पेटवर Ivory रंगाची सुंदर साडी नेसली होती. तिच्या या लूकचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं होतं.
