बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर यशाच्या शिखरावर असतानाही काही चित्रपटांना नकार दिला आहे. अनेक जण लग्नानंतर मोजक्याच कलाकृतींमध्ये पाहायला मिळतात. असंच काहीसं अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही केलं होतं. ऐश्वर्या रायने तिचा नवरा अभिषेक बच्चनसाठी शाहरुख खानच्या हॅपी न्यू इयर या चित्रपटाला नकार दिला होता.

शाहरुख खानबरोबर ‘हॅपी न्यू इयर’’मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी लागण्यापूर्वी ऐश्वर्या रायला दिग्दर्शिक फराह खानची पहिली पसंती होती. मात्र, मुलगी आराध्याला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्या नुकतीच सिनेसृष्टीत परतली होती. चित्रपटात तिची जोडी पती अभिषेक बच्चनची नाही, तर शाहरुख खानबरोबर असणार होती म्हणूनच तिने ही भूमिका नाकारल्याचं सांगितलं आहे

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हा कॉमेडी चित्रपट शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिकांमुळे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. मात्र, ऐश्वर्या रायने या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला. ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी चित्रपटात इतर कलाकारांबरोबर दाखवली गेल्यास पडद्यावर काहीसा अवघडलेपणा निर्माण होईल, असं तिला वाटत होतं. ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने मॅटर्निटी ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी ‘हॅपी न्यू इयर’ हा अगदी योग्य चित्रपट ठरला असता, असं वाटत असूनही तिने ही ऑफर का नाकारली, यामागचं कारण सांगितलं होतं.

ऐश्वर्या रायने ‘हॅपी न्यू इयर’ का नाकारला?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार २०१८ मध्ये पत्रकार राजीव मसंद यांच्याशी संवाद साधताना ऐश्वर्या रायने ‘हॅपी न्यू इयर’ हा मॅटर्निटी ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी अगदी योग्य चित्रपट वाटत होता, अशी कबुली दिली होती.ऐश्वर्या याबद्दल म्हणालेली, “म्हणून जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा आई झाल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी हा अगदी योग्य चित्रपट आहे, असं मला वाटलं. एवढ्या मोठ्या ब्लॉकबस्टरमध्ये अशी भूमिका साकारायला मिळणं, त्यानंतर चित्रपटाचं प्रदर्शन आणि बॉक्स ऑफिसवरचं यश हे सगळं तुम्ही आधीच पाहू शकता. खरंच, पुनरागमनासाठी यापेक्षा चांगला चित्रपट कोणता असता?”

मात्र, या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये एक अडचण होती. अभिषेक बच्चन आधीच या चित्रपटाचा भाग होता. ऐश्वर्याच्या मते, या चित्रपटासाठी ही कास्टिंग योग्य ठरली नसती. कारण चित्रपटात तिची जोडी अभिषेकबरोबर नव्हे, तर शाहरुख खानबरोबर होती आणि तिचा व शाहरुख खानचा रोमँटिक ट्रॅक होता. “पण अभिषेकबरोबर हे नेमकं कसं घडेल, हे मला माहीत नव्हतं. कारण तो आधीच या चित्रपटाचा भाग होता. मी फराहला सांगितलं होतं की, जर तुम्ही मला एकटीला विचाराल, तर मी नक्कीच हा चित्रपट करेन. मनवा लागेसारखं गाणं करणं तर खूप चांगलं ठरलं असतं. पण मला वाटत होतं की या कास्टिंगच्या समीकरणात ते योग्य वाटणार नाही. आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात असा चर्चेचा विषय निर्माण करण्याची गरजच काय?”

तिने मान्य केलं की व्यावसायिकदृष्ट्या इतकी मोठी संधी सोडणं तिच्यासाठी सोप नव्हतं. मात्र, अखेरीस अभिनेत्री म्हणून नव्हे, तर अभिषेकची पत्नी म्हणून तिने हा निर्णय घेतला. ऐश्वर्याने म्हटलं होतं, “एक अभिनेत्री म्हणून ही संधी सोडणं सोपं नव्हतं. पण एक पत्नी म्हणून मी या निर्णयावर ठाम राहिले”. ऐश्वर्या म्हणालेली, “हो, मला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती आणि हा एक मजेशीर प्रवास ठरला असता, असं मला वाटलं. हा चित्रपट करताना आम्ही खूप धमाल केली असती आणि हा एक छान अनुभव ठरला असता. पण मी आणि अभिषेक दोघेही या चित्रपटात असणं आणि आमची जोडी एकमेकांसोबत न दाखवणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळे ही ऑफर नाकारावी लागली”.