Aishwarya Rai Viral Video: ऐश्वर्या राय बच्चन पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो लक्ष वेधून घेत आहेत. ऐश्वर्याच्या रॅम्प वॉकच्या व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे.
ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉकवर चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती रॅम्पवर पुढे येते, फोटोसाठी पोज देते, फ्लाइंग किस देते आणि परत चालत जाते. तसेच तिच्या चेहऱ्यावर हसूही दिसते. तिच्या या आत्मविश्वासाचे आणि तिच्या लूकचे सगळीकडे कौतुक होत असल्याचे दिसत आहे.
ऐश्वर्या रायचा पॅरिस फॅशन वीकमधील व्हिडीओ व्हायरल
रॅम्प वॉकसाठी ऐश्वर्याने Yara Shoemakerने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा वेल्वेट गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने क्राऊनही घातला होता. तिच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एकाने लिहिले, “फक्त एकच क्वीन आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “इतक्या वर्षांनंतरही तू जेव्हा स्टेजवर येतेस, तेव्हा तीच जादू अनुभवायला मिळते; तू ज्या सहजतेने, आत्मविश्वासाने वावरतेस ते कौतुक करण्यासारखे आहे. तुला पाहिल्यावर मला स्त्री असल्याचा अभिमान वाटतो. तू फक्त सुंदरच नाहीस तर आमच्या पिढीतील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहेस.”



अनेक चाहत्यांनी ऐश्वर्याला १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्याची आठवण करून देत लिहिले, “ती इतिहासातील सर्वांत यशस्वी मिस वर्ल्ड आहे”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
तसेच, पॅरिस फॅशन वीकमधील काही बॅकस्टेजचे व्हिडीओदेखील पाहायला मिळाले. एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ईवा लोंगोरिया(Eva Longoria)ला मिठी मारताना दिसली, तर एका व्हिडीओमध्ये ती सिमोन ॲशले (Simone Ashley) बरोबर बोलत असल्याचे दिसत आहे.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याबरोबरच केंडल जेनर (Kendall Jenner), सेलिन डिऑन (Celine Dion), ईवा लोंगोरिया, सिमोन ॲशले (Simone Ashley), व्हायोला डेव्हिस (Viola Davis) आणि जेन फोंडा (Jane Fonda) यांनीही हजेरी लावली होती.
