Aishwarya Rai & Abhishek Bachchan : ‘धूम’, ‘बंटी और बबली’, ‘गुरू’, ‘हाऊसफुल’ यांसारख्या असंख्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिषेक बच्चनचा आज ( ५ फेब्रुवारी ) वाढदिवस. यानिमित्त संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान, पत्नी ऐश्वर्या रायने सुद्धा खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या रायने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ५ फेब्रुवारीला रात्री उशिरा तिने ही पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने नवऱ्याचा उल्लेख ‘Baby Papa’ असा करत त्याचं वय देखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. अभिषेक आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला.

ऐश्वर्या लिहिते, “५० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर ‘Baby Papa…’ तुला खूप-खूप प्रेम, शांती, आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो. कायम असाच आनंदी राहा.”

ऐश्वर्या अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त काय पोस्ट शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अभिनेत्रीने पोस्ट शेअर केल्यावर चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अरे वाह किती गोड फोटो आहे अभिषेक वाढदिवसाच्या शुभेच्छा”, “वॉव किती गोड कॅप्शन दिलंय”, “तुम्ही दोघं कायम असेच आनंदी राहा” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांचा विवाहसोहळा २००७ मध्ये थाटामाटात पार पडला होता. २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आराध्याच्या संस्कारांचं सोशल मीडियावर कायम कौतुक केलं जातं. काही दिवसांपूर्वी ख्रिसमस व्हेकेशनचा आनंद घेण्यासाठी हे तिघंही एकत्र परदेशात फिरायला गेले होते.

दरम्यान, अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्युजी’ सिनेमातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ सिनेमात झळकणार आहे. यामध्ये शाहरुख खान प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर, ऐश्वर्या दोन वर्षांपूर्वी मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन २’ सिनेमात झळकली होती. यानंतर तिने कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.