Aishwarya Rai’s Message On Caste And Religion: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने सत्य श्री साई बाबा यांच्या जन्मशताब्दी समारंभात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आंध्र प्रदेश येथे पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हजेरी लावली होती.

ऐश्वर्याने या कार्यक्रमात भाषणात केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. साई बाबांच्या शिकवणीबद्दलही ती बोलली. ती म्हणाली, शिस्त, समर्पण, भक्ती, दृढनिश्चय आणि कोणत्याही गोष्टीत भेदभाव न करणे महत्वाचे आहे; तसेच सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेम पसरवले पाहिजे असेही ती म्हणाली.

“फक्त एकच जात आहे…”

ऐश्वर्या पुढे असेही म्हणाली, “फक्त एकच जात आहे, ती माणुसकीची जात आहे. फक्त एकच धर्म आहे तो प्रेमाचा धर्म आहे. फक्त एकच भाषा आहे आणि ती भाषा हृदयाची आहे. देव फक्त एकच आहे, जो सर्वव्यापी आहे. साईराम, जय हिंद”, असे म्हणत ऐश्वर्याने तिचे भाषण संपवले.

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. भाषणानंतर ऐश्वर्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडल्याचे दिसत आहे.

ऐश्वर्या राय ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या कामाचे, तिच्या भूमिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होते. तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडते. ऐश्वर्याने आजवर अनेक कलाकारांबरोबर अनेक चित्रपटांत काम केले आहे.

ऐश्वर्याच्या कामाबरोबरच अनेकदा तिच्या खासगी आयुष्याचीदेखील चर्चा होताना दिसते. काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, कलाकारांनी त्यावर कोणतेही वक्तव्य केले नाही. पण, त्यांनी विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर अभिषेकने वेळोवेळी ऐश्वर्याचे कौतुक केले. आराध्याला ऐश्वर्याने ज्या पद्धतीने, ज्या संस्कारात मोठे केले, त्याचे सर्व श्रेय ऐश्वर्याचे आहे असेही अभिषेक म्हणाला आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ ला लग्नागाठ बांधली. २०११ ला त्यांना मुलगी झाली. तिचे नाव आराध्या असे आहे. नुकताच आराध्याचा १४ वा वाढदिवस झाला. ऐश्वर्या विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. यादरम्यान तिची लेक आराध्यादेखील तिच्याबरोबर असते. ऐश्वर्या आणि आराध्याचे बॉण्डिंग चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.